महाराष्ट्रातलं वातावरण बिघडलंय, हरियाणातलं वातावरण इकडे जोडू नका, नाहीतर मुसंडी फुसंडी जमत नाही. मराठ्यांनी फासा टाकला की गेलाच, इथं मराठ्यांची मुसंडी वेगळीच असते. मराठ्यांसोबत डोकं लावू नका, इथे आरक्षण द्यायचं बघा. फडणीससाहेब तुम्हाला डोकं आहे का?? इथे प्रत्येक मतदारसंघात लाख लाख मतदान आहे, पूर्ण बुकटा वाजवून टाकू. तुमचं एकही सीट राज्यात निघू देणार नाही, तुम्ही निर्णय न घेता नुसती आचारसंहिता लावून दाखवा, तुमचे एकही सीट राज्यात निवडून येऊ देणार नाही.अशा शब्दात मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी भाजपला इशारा दिला आहे.
पत्रकारांशी जालना इथे बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की,मराठ्यांच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी केल्यास तुमचं 100 % सरकार येईल, इथं मराठ्यांच्या नादी लागून मराठ्यांच्या आयुष्याचं, समुदायाच्या भविष्याचं रक्त प्यायचं इथं चालबाजी चालणार नाही. मराठ्यांचा तुम्ही अवमान आणि अपमान करून त्यांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे, यांनी आमची खुन्नस धरली आहे, आमच्या उरावर बसून त्यांनी दुसऱ्याला आरक्षण दिले आहे आणि आम्हाला दिले नाही. त्यामुळे, आमचा प्रश्न न सोडता आचारसंहिता लावा मग मी तुम्हाला सांगतो!!हरियाणात काँग्रेसच्या अपेक्षेनुसार निकाल लागले नाहीत. काँग्रेसला भाजपकडून सत्ता खेचून घेता आली नाही. त्याची वेगवेगळी विश्लेषणे माध्यमांमध्ये सुरू असताना हरियाणा हिंदू समाज एकवटला.जाट वर्चस्वाविरुद्ध ओबीसी समाज एकत्र आला. त्यांनी भाजपला मतदान केले, असे विश्लेषण पुढे येत आहे. नेमका हाच मुद्दा घेत मराठा आरक्षण आंदोलनाचे एकजातीय राजकारण करू पाहणाऱ्या मनोज जरांगे यांना प्रश्न विचारल्यावर संतप्त होत ते म्हणाले की, हरियाणा आणि महाराष्ट्राचा संबंध काय??, ते दोन वेगळे विषय आहेत. इथे मराठा एकवटला की तो सगळ्या भाजपच्या उमेदवारांना पाडेल, अशा गर्जना जरांगे यांनी केल्या.
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेत हरियाणातला भाजपचा विजय आणि काँग्रेसचा पराभव हाच मुख्य विषय राहिल्याने त्या विषयावर जरांगे यांना प्रश्न विचारले गेले, त्यावर मत व्यक्त करताना जरांगे संतप्त झाले, हरियाणात जाट वर्चस्वाविरुद्ध सगळे ओबीसी आणि दलित एकवटले. त्यांनी भाजपला मतदान केले. महाराष्ट्रात त्याचे पडसाद कसे उमटतील?या प्रश्नावर ते म्हणाले की, भाजपावाले कधी हिंदुत्व म्हणतात, कधी ओबीसी म्हणतात यांचं यांनाच कळत नाही. हरियाणा आणि महाराष्ट्रात फरक आहे, हरियाणात एखादा मराठा, एखादा जाट किंवा एखाद्या शेतकऱ्याने मतदान केलंच असेल ना ?, मतदान होऊन गेलं की हे असं बोलतात.महाराष्ट्रातून आम्ही पण भाजपला 106 आमदार दिले होते, इकडचा प्रश्न वेगळा तिकडचा प्रश्न वेगळा आहे, इथे एकटा मराठा 50 ते 55 % आहे. इथे एका मतदार संघात लाख-लाख मतदान आहे. हरियाणातील निकालावर भाजपने जाऊ नये.
निवडून येताना आणणारा एक आणि नाव दुसऱ्याचं घ्यायचं ही यांची पद्धत आहे, हे एकदम खालच्या थराला जात आहेत. जो मोठे करतो त्यांच्याच नावाने हे खडे फोडतातय. यांना हिंदुत्वाने निवडून आणलं की ओबीसींनी निवडून आणलं की यांना बहुजनांनी निवडून आणलं याचा काही ताळमेळ नाही. ज्यांनी निवडून आणलं, त्यांच्याविरुद्धच नाव हे सांगत आहेत असंही जरांगे पाटील म्हणाले.