बीड- मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार उतरवणार नाही हे जाहीर केल्यामुळे आणि मग नंतर अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज परत घेतल्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघातील दोघांच्याही समर्थकांत प्रचंड नाराजी पसरली आहे.
बीड विधानसभा मतदारसंघातून कोण बाजी मारेल हे निश्चितपणे सांगता येणे अवघड झाले आहे. दोन सख्खे चुलत भाऊ एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरले असून ते दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत यातील संदीप क्षीरसागर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तर डॉक्टर योगेश क्षीरसागर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत .मराठा समाजातील ज्योतीताई मेटे अनिल जगताप यांनीही उमेदवारी अर्ज कायम ठेलेले आहेत.
दोन्ही मराठा उमेदवारांना जरांगे पाटलांचा पाठिंब्याची अपेक्षा होती मात्र जरांगेंच्या आजच्या निर्णयानंतर मराठा मतदार आता ज्योतीताई मेटे आणि अनिल जगताप या दोघांपैकी कुणाच्या पाठीशी राहतो , की शरद पवार अथवा अजित दादांना समर्थन देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. बीड विधानसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टर चा सर्वाधिक प्रभाव निर्माण झालेला आहे पण त्यांनी कुणालाही समर्थन न देण्याचा निर्णय घेतल्याने आता दोन मराठा विरुद्ध दोन ओबीसी अशी लढत रंगणार आहे.