मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या तसेच अभिनेता सलमान खान याला सतत मिळणाऱ्या धमक्या यामुळे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई प्रचंड चर्चेत आहे. एप्रिल महिन्यात लॉरेन्सच्या टोळीतील शूटर्सनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला, त्यानंतर सलमानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. तर आता आठवडाभरापूर्वीच (12 ऑक्टोबर) सलमानचा खास मित्र असलेले आणि राजकारणी बाबा सिद्दीकी यांची लॉरेन्सच्या गँगमधील शूटर्सनीच निर्घृण हत्या केली.
सध्या लॉरेन्स हा गुजरातच्या साबरमती तुरूंगात कैद आहे. याचदरम्यान लॉरेन्स बिश्नोईचे चुलत भाऊ 50 वर्षीय रमेश बिश्नोई यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. लॉरेन्स नेहमी महागडे कपडे आणि बुट वापरतो, त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येत असल्याचा दावा त्याच्या एका चुलत भावाने केला आहे.
लॉरेन्स बिश्नोई याच्या भावाचा मोठा खुलासा
आम्ही सुरुवातीपासूनच श्रीमंत होतो. लॉरेन्सचे वडील हे हरयाणा पोलीस दलात शिपाई होते. गावाकडे त्यांची 110 एकर जमीन आहे. लॉरेन्स नेहमी महागडे कपडे आणि शूजचा वापर करतो. आता ही त्याचे कुटुंब त्याच्यावर वार्षिक 35-40 लाख रुपये खर्च येतो, अशी माहिती रमेश बिश्नोई यांनी दिली.
लॉरेन्स बिश्नोई 2014 मध्ये राजस्थान येथील सालासर बालाजी मंदिर यात्रेदरम्यान गोळीबारानंतर तुरूंगात आहे. सध्या तो अहमदाबाद येथील साबरमती मध्यवर्ती तुरूंगात कैद आहे. गुजरात एटीएस आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा अनेक प्रकरणात त्याची चौकशी करत आहे.
लॉरेन्स कॅनडा पोलिसांच्याही रडारवर
लॉरेन्स बिश्नोई गेल्या काही वर्षांत तीन मोठ्या हत्यांप्रकरणी केवळ भारताच्याच नव्हे तर कॅनडाच्या पोलिसांच्याही रडारवर आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसावालाची हत्याही त्याच्याच टोळीतील गुंडांनी केली होती.