लो लो लागला ,आंबेचा भेदाभेद कैचा आला कंटाळा, या नवरात्रात म्हंटल्या जाणाऱ्या रेणुकामातेच्या आरतीच्या शेवटच्या कडव्यात ‘ तानाजी देशमुख झाला ब्रम्हानिष्ठ लो लो लागला ‘ असा उल्लेख आहे,या देविभक्त तानाजी देशमुखांचे वंशज अंबडला देशमुख गल्लीत राहतात,आजही त्यांच्यात देवीच्या भक्तीची परंपरा आणि ओढ आहे,अंबडचे मत्स्योदरी देवी मंदिर पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध देवस्थान ,माहुरच्या देवीचे ठाणे म्हणून ओळख,मंदिराच्या गाभाऱ्यात महाकाली,महालक्ष्मी, महासरस्वतीचे तांदळे आहेत.
खाली मंदिराच्या पायथ्याला पायऱ्यांजवळ एक मोठी शिळा आहे ती तानाजी देशमुख यांची असल्याचे सांगितले जाते,ही शिळा दररोज तीळ तीळ वाढत जाते असंही म्हणतात. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकरांनी या देवस्थानचा जीर्णोद्धार केलाय,तर अलीकडच्या काळात आ.राजेश टोपे यांनी ते मंत्री असतांना भरीव विकास कामे केलीत त्यामुळे आधीच सुंदर आणि आकर्षक असणाऱ्या या देवस्थानची महती अधिक वाढलीय,माशाच्या आकाराच्या डोंगरात हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशास्त्रानुसार उभारलेले आहे,आज मंदिर परिसरात बाग-बगीचा फुलवलाय,लहान मुलांसाठी खेळणी बसवलीय,प्रवेशद्वार,रस्ते,इमारती,कार्यालय असं आधुनिक रूप या परिसराने घेतलंय,एकंदर मोठा कायापालट केलाय.येथे घटी बसण्याची पध्दत आहे,घटस्थापनेपासून नवमी पर्यंत मंदिर परिसरातच मुक्काम करून उपासना करण्यास घटी बसणे असे म्हणतात, तर सप्तमीला मंदिराच्या चौकात झोळीत लेकरं टाकण्याची परंपरा आहे जी सुरक्षितपणे पार पाडली जाते,मलाही असे झोळीत टाकल्याचे आई सांगते,नवरात्रीच्या आरतीत सप्तमीच्या कडव्यात ‘ भक्त संकटी पडता, झेलून घेसी वरचे वरी ‘ असा उल्लेख आहे,या ओळींचा संदर्भ मी या परंपरेशी लावतो.
लहानपणी दररोज पहाटे आणि रात्री दर्शनाला जायचो,पहाटे देवीला प्रदक्षिणा घालायची,देवीला प्रदक्षिणा म्हणजे संपूर्ण डोंगराला वेढा घालावा लागत असे,दाट झाडी,खडक,दगडधोंड्यातून रस्ता काढावा लागायचा पण मजा यायची.रात्री देवीच्या आरतीला मोठी गर्दी असायची,समूहसुरात आरत्या गायल्या जायच्या त्यात देवीच्या आरत्या सुरू झाल्या की काही महिलांच्या अंगात येत असे त्या आळोखे-पिळोखे देऊन घुमत असत,हे अंगात येणं मंत्रपुष्पांजली संपेपर्यंत ओसरत असे त्यानंतर भक्तमंडळी अंगात येणाऱ्या महिलांच्याही पाया पडत असत.आरतीनंतर साखर-खोबऱ्याचा किस घातलेला प्रसाद आणि तांबूल दिला जात असे,हा प्रसाद घराघरातुन करून आणलेला असे,आजही मला नवरात्रातील आरत्या पाठ आहेत कारण इथे आरती करून आम्ही घरीही आरतीसाठी एकत्र असायचोत.अंबडच्या यात्रेत शिंगाडे मिळतात हे शिंगाडे राजगिऱ्याच्या पिठापासून करतात,शर्करागुंठीत शिंगाडे हे अंबडचे वैशिष्ट्य आहे.पांढरेशुभ्र शिंगाडे बनवण्यात अंबडची भोई मंडळी निष्णात आहेत, याशिवाय साखर फुटाणे,बत्ताशे,रेवड्या,पट्टी,फुटाणे,खारे शेंगदाणे, शेव-पपडी,चिवडा म्हणजे यात्रेला येणाऱ्याचे सर्वात आवडीचे खाद्य.सातवी माळ म्हणजे अंबडचा सार्वजनिक उत्सव,मंदिराचा परिसर भक्तांनी गच्च भरलेला,खेळणी, मिठाईच्या दुकानांची रेलचेल, सर्वत्र वाजणाऱ्या पुंग्या-पिपाण्या, पायऱ्यांवर पायरीगणिक नारळ फोडणारे भक्त,देवीच्या मंदिरात नवसाची लेकरं झोळीत टाकण्यासाठी जमलेले छोट्याचे पालक,त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि तणाव,रहाटपाळणे, मेरी-गो-राउंड,छोट्या चकऱ्या आणि कितीतरी, दरवर्षी एखादी वेगळीच खेळणी संपुर्ण जत्रेत धूम करायची,
गावात आमच्या घरासमोर असलेल्या टॉकीजमध्ये सकाळपासून पिक्चर चालू असायचे,हे सिनेमे नवेच असायचे असे नाही तर कोणताही चित्रपट जत्रेत भरपूर गर्दी खेचायचा, जीवाची जत्रा करायसाठी आलेल्यांचे चार घटका मनोरंजन एवढाच माफक हेतू,थोडक्यातही समाधान कसं मानावं हे ही जत्रा सातव्या माळेला आम्हाला शिकवत आलीय,हाच श्री मत्स्योदरी देवीचा आमच्यासाठी आशीर्वाद असल्याची आमची भावना आणि श्रद्धा आहे!
बोल भवानी की जय!