गेल्या दहा दिवसांपासून प्रतिक्षा असलेली घोषणा अखेर आज झाली,भाजपा गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. आधी निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक झाली त्यात निवडीची रूपरेषा ठरवल्या नंतर भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.देवेंद्र फडणवीस यांचे नाव चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगुंटीवार यांनी सुचवले तर रवींद्र चव्हाण आणि आशिष शेलार यांनी अनुमोदन दिले,टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या निवडीचे नवनिर्वाचित आमदारांनी स्वागत केले. फडणवीस हे आजच राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करतील.
देवेंद्र फडणवीसच का?
अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी त्याग केला. मुख्यमंत्री पदावर नैसर्गिक दावा असताना उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. आता पाळी शिंदे यांची हाेती. पाच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे जसे वागले तसे शिंदे यांनाही वागता आले असते. शरद पवार यावेळीही एका ‘उद्धव ठाकरेंच्या’ शाेधात हाेतेच. अर्थात आकडे भाजपाच्या बाजूने हाेते. पण ताेडाेफोड करून पवारांनी जुगाड जमवले असते. मात्र, एकनाथ शिंदे हे माेदी-शाह यांच्या बाजूने उभे राहिले. प्रगल्भ राजकारणी अशा प्रसंगात कसा वागताे त्याचा परिचय शिंदेंनी दिला. राजकारणात टिकायचे असेल तर कुठल्या एका जागी टिकावे लागते. शरद पवार, उद्धव ठाकरे यांना जमले नाही. ‘जिधर बम उधर हम’ असे राजकारण कराल तर जनता एक दिवस तुम्हाला तुमची जागा दाखवते. शिंदेंना मानले पाहिजे. त्यांनी चार दिवस उशिराने का हाेईना मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग माेकळा करून दिला.
तब्बल पाच वर्षांनंतर फडणवीसांना अच्छे दिन आले आहेत. या काळात काय काय साेसले नाही या चाणक्याने? झाडून साऱ्या विराेधकांचे टार्गेट देवेंद्र फडणवीस हाेते. मुख्यमंत्री हाेते शिंदे. मात्र निशाण्यावर फडणवीस हाेते. संजय राऊत यांचा राेजचा भाेंगा तर हाेताच. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदाेलन करणाऱ्या मनाेज जरांगे पाटील यांनीही फडणवीसांना साेडले नाही. अतिशय खालच्या पातळीवरून फडणवीसांवर हल्लाबाेल झाला. उद्धव ठाकरे यांनी ‘एक तर तू राहशील, नाहीतर मी राहीन’ अशा शब्दात फडणवीसांना ललकारले हाेते. फडणवीसांनी आपल्याला ‘रिकामे’ केले हा त्यांचा राग हाेता. 2019 च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना यांची युती हाेती. लाेकांनी या युतीच्या बाजूने काैल दिला हाेता. पण मुख्यमंत्री हाेण्याच्या महत्त्वाकांक्षेतून उद्धव ठाकरे यांनी धाेका दिला. शरद पवारांकडे गेले. पवार अशा बकऱ्याच्या शाेधात हाेतेच. त्यांनी या ठाकरेंची दुखरी नस हेरली. महाविकास आघाडी नावाने पवारांनी दुकान फिट केले. भानगडीचे हे सरकार फार टिकणार नव्हतेच. अडीच वर्षांत काेसळले. पुढे साऱ्यांच्या मार्गात फडणवीस हा अडथळा हाेता. फडणवीसांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री हाेऊ द्यायचे नव्हते म्हणून शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोडले. मात्र उद्धव ठाकरे नाकर्ते निघाले. त्यांचेच आमदार त्यांच्या विराेधात गेले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदारांनी बंड केले. त्यात ठाकरे यांना घरी बसावे लागले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने ठाकरे सुडाने पेटून उठले. त्या द्वेषाग्नीत ठाकरे वाहवत गेले. हिंदुत्व साेडले. मुस्लिमांचे लांगूलचालन सुरू झाले. लाेकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने दलित आणि मुस्लिम मतांची माेट बांधली. विषारी प्रचार केला. घटना बदलण्यासाठी माेदींना 400 जागा हव्या आहेत, असा प्रचार झाला. त्याचा भाजपाला तडाखा बसला. त्या निकालाचा चुकीचा अर्थ विराेधी नेत्यांनी घेतला. आता आपलीच हवा हवेत विराेधी नेते तरंगू लागले. ‘हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा हाेणार नाही’ असे सांगत शरद पवार फिरू लागले. लाेकसभा निवडणुकीत महाआघाडी आणि महायुती यांना मिळालेल्या मतांमधला फरक फार नव्हता. महायुतीला एक टक्कापेक्षाही कमी मतं हाेती. तीन टक्केही मतदान वाढवले तर आपण बाजी पालटवू शकताे हे फडणवीसांच्या लक्षात आले. त्यांनी तसा फॉर्म्युला दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मदतीला धावला. साेबतीला महायुतीची ‘लाडकी बहीण’ याेजना कामी आली आणि बघता बघता चमत्कार झाला. भाजपाने कधी नव्हे एवढ्या जागा जिंकल्या.
विराेधकांनाही हे करता आले असते; पण गाफील राहिले. जागावाटपात भांडत बसले. सहा महिन्यात लाेकांच्या विचारात काय फरक पडणार? लाेकांना आपल्यालाच मतं द्यायची आहेत, अशा गुर्मीत विराेधक हाेते. उद्धव तर सारखे म्हणायचे, ‘माझा बाप चाेरला, पक्ष चाेरला, चिन्ह चाेरले.’ आता माझे मतदारही चाेरले असे म्हणण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. युतीत 25 वर्षे आपण सडलाे असे उद्धव म्हणाले हाेते. आता काँग्रेससाेबत पाच वर्षांतच त्यांचे शेणखत झाले; पण बाेलायची साेय नाही. फडणवीसांना गंभीरपणे घेतले नाही तर काय हाेते त्याचा हा नमुना आहे. ‘तुतारी’ वाजली नाही, ‘मशाल’ पेटलीच नाही. फाजील आत्मविश्वास विराेधकांना नडला. कुणी भावाला तर कुणी पत्नीला तिकिटे वाटली. संपूर्ण राज्याचे नेतृत्व करील, पक्षाला साेबत घेऊन चालेल असा नेताच आज विराेधकांकडे उरला नाही. जे आहेत ते त्यांच्या मतदारसंघापुरते आहे. ‘मी आणि माझे कुटुंब’ म्हणून पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थाेरात पडले ,नाना पटाेले पडता पडता वाचले. प्रदेश अध्यक्षाला जिंकण्यासाठी टपाली मतांचा आधार घ्यावा लागताे यावरून काँग्रेसची स्थिती किती केविलवाणी झाली आहे, ते लक्षात येईल.
पाेपट केव्हाच मेला आहे; पण हे राहुलबाबाला काेण सांगणार? राहुल गांधी यांच्या नेतृत्वात गेल्या तीन निवडणुका काँग्रेस हरली. तरीही राहुल गांधींच्या नावाची पालखी काँग्रेसवाल्यांना उचलावी लागते. 10 वर्षांपूर्वी काँग्रेसने सपाटून मार खाल्ला तेव्हा आत्मपरीक्षणासाठी ज्येष्ठ नेते ए. के. अँथनी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने समिती नेमली हाेती. त्यांनी दिलेला अहवाल अजूनही बाहेर येऊ दिला गेला नाही. काँग्रेसला अच्छे दिन येणार कसे? आता तर विधानसभेत विराेधी नेता म्हणून बसण्याएवढीही ताकद विराेधकांकडे नाही. राज्यसभेत पाठवण्याएवढेही आमदार मिळणे अवघड आहे. शरद पवारांची राज्यसभेची दीड वर्षे उरली आहेत. त्यानंतर त्यांना सक्तीची निवृत्ती आहे. सावकाश पुढे सकाळचा ‘भाेंगा’ही बंद पडेल. पाच वर्षांपूर्वी एका सभेत फडणवीसांनी एक शेर म्हटला हाेता- ‘मेरा पानी उतरते देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मै समंदर हू, लाैटकर वापस आऊंगा.’ फडणवीसांनी म्हटलेल्या ‘मी पुन्हा येईन’ या इशाऱ्याची विराेधक चेष्टा करीत राहिले.
सुप्रिया सुळे तर म्हणाल्या हाेत्या, ‘अकेला देवेंद्र क्या करेगा?’ एकटा देवेंद्र काय करू शकत नाही ते आज महाराष्ट्र पाहात आहे. विराेधकांनी जबरदस्त फिल्डिंग लावली, जाती-पातीचा आधार घेतला तरीही या आधुनिक अभिमन्यूने चक्रव्यूह भेदला. गेल्या तीन विधानसभा निवडणुका फडणवीस यांच्या नेतृत्वात झाल्या. तिन्ही निवडणुकीत भाजपाने शंभरावर जागा जिंकल्या. राजकारण बेभरवशाचे झाले आहे. शर्ट बदलावा तसे लाेक पक्ष बदलताहेत. गेल्या पाच वर्षांत खूप उलथापालथ झाली. मात्र फडणवीसांचा एकही आमदार फुटला नाही. हल्ली दुर्मिळ झालेली एखाद्या नेत्याबद्दलची ही बांधिलकी, हा विश्वास फडणवीस यांच्या रूपात सहकाऱ्यांना दिसताे. त्यातूनच फडणवीसांचा ‘देवाभाऊ’ झाला, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी तर त्यांना ‘परम मित्र’ संबाेधले होते.