
निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागला असला तरी महायुतीमध्ये खात्यांवरुन आणि पदांवरुन चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला असला तरी त्यांना गृहखाते व नगरविकास खात्याची मागणी केली आहे. आता भाजप हे मान्य करणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, कॉंग्रेसकडून धक्कादायक निकाल लागल्यानंतर निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात येत होते. त्यावर आता एका अधिकाऱ्याने स्पष्टीकरण दिले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अनपेक्षित असा निकाल हाती आला आहे. महाविकास आघाडीला यामुळे मोठा फटका बसला. अगदी विरोधी पक्षनेता पदावर दावा करण्याएवढ्या देखील जागा महाविकास आघाडीच्या कोणत्याच घटक पक्षाला मिळवता आल्या नाहीत. यानंतर कॉंग्रेसने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन गंभीर आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. एस. चोक्कलिंगम म्हणाले की, सायंकाळी शेवटच्या तासात मतदानाचा टक्का वाढणे ही अतिशय सामान्य बाब आहे. निमशहरी आणि शहरी भागात शेवटच्या काही तासात मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढतो, असे मत एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केले.
एस. चोक्कलिंगम म्हणाले की,”सायंकाळी सहा वाजण्याची आधी जो मतदार रांगेत येऊन उभा राहतो, त्याचे मतदान संपेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरूच राहते. ही रांग संपण्यासाठी कधी कधी सहा वाजण्याची मर्यादाही पुढे जाते. २०१९ साली सायंकाळी ५ वाजता जवळपास ५४.४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर अंतिम मतदानाची आकडेवारी ६१.१ टक्के झाली होती, असे मत एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केले आहे.
पुढे ते म्हणाले की, सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची माहिती ही टेलिफोनवरून तोंडी दिली जाते. मतदान संपल्यानंतर मात्र मतदानकेंद्रावरील अधिकारी फॉर्म १७-सी भरून देतात, ज्यामध्ये अंतिम आकडेवारी नमूद केलेली असते. असे स्पष्टीकरण महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले आहे. त्यामुळे कॉंग्रेसने निवडणूक आयोगावर केलेल्या गंभीर आरोपांवर आता पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर पोस्ट करुन एस. चोक्कलिंगम यांनी आपले मत व्यक्त केले आहे.