बीड-
विधानसभा निवडणुकीसाठी मराठा समाजाकडून अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यातल्या अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले नाही. त्यांना जरांगे यांनी खडे बोल सुनावले आहे. अशा उमेदवारांनी पचका करून ठेवला आहे असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. ज्यांनी अर्ज भरले त्यांना सांगितले होते, अपक्ष अर्ज भरून मते खायचे काम करू नका. त्यामुळे ज्यांना पाडायचे आहे, ते पडणार नाहीत. समाजाला सांगितले आहे. माझा पाठिंबा अपक्षाला आणि कुणालाच नाही. ही बाबत जरांगे यांनी स्पष्ट केली आहे.
मला समाजाचे भविष्य बघायचं आहे. मूर्ख होऊन चालणार नाही. दीडशे जणांना उभे केले असते. मात्र त्यांच्यासाठी सहा कोटी समाजाचे वाटोळे करू शकत नाही. तो क्षणिक आनंद आहे. मला समाजाला आरक्षण देऊन आयुष्यभराचा आनंद द्यायचा आहे. मी मूर्खासारखे चाळे नाही करू शकत. मागे सरकलो म्हणून काय वाईट झाले. मी मराठा समाजाचे काम करतो. दीडशे जणांचे काम करत नाही. त्यांच्यासाठी करोडो मराठ्यांना अडचणीत आणणार नाही. ते जर पडले असते तर समाजाला हिणले गेले असते. टोमणे मिळाले असते. त्यामुळे माझ्या समाजाची मान खाली जाईल म्हणून मी माघार घेतली असे स्पष्टीकरण जरांगे यांनी दिले. समाजासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. या राजकारणासाठी आरक्षण जायला नको म्हणून मी ही भूमिका घेतली असेही ते म्हणाले.
पुन्हा एकदा आरक्षणाचा लढा सुरू झाला आहे. आम्हाला कुणाच्याही प्रचाराला जायची गरज नाही. आता पुन्हा लढा उभा करायचा आणि आरक्षण मिळवायचं आहे. राजकारणासाठी असतो तर उमेदवार उभे केले असते. माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे. या समाजाला मी मायबाप मानलं आहे. समाज अडचणीत येऊ नये म्हणून मी योग्य पाऊल उचलत आहे. कुणाच्याही प्रचाराला आणि सभेलाही जाऊ नका. माझा निरोप आला तर बघू आणि नाही आला तर तुमच्या हिताचा निवडून येईल तिकडेच मतदान करायचं. पण शक्यतो पाडापाडी कराचं असे स्पष्ट आदेश जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिले आहे.
आता मराठा समाजाने कोणाला पाडायचे याचीही चर्चा सुरू झाली आहे. भाजपला जरांगे यांनी जाहीर पणे या आधीही विरोध केला होता. त्याचा फटका लोकसभेला भाजपला बसला. त्याची झळ भाजपला मराठवाड्यात दिसून आली. आता विधानसभेतही जरांगे यांनी पाडापाडीचे आदेश दिले आहेत. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. शिवाय तो निर्णायक मतदारही आहे. त्यामुळे मराठे कोणाला मतदान करणार आणि कोणाला पाडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.