
नमस्कार…!
दि.३१|१०|२०२४
*॥ नरकचतुर्दशी ॥*
🟣 आश्विन कृष्ण चतुर्दशीला दीपावलीची चतुर्दशी म्हणतात.
🟣 नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा हे तीन दिवस दीपांनी आरती करतात म्हणून;ही दीपावली म्हटली आहे.
(मत्स्यपुराण & ज्योतिर्निबंध -नारद)
🟣 या दीपावलीच्या चतुर्दशीला; (तिळाच्या) तेलात लक्ष्मी व उदकांत गंगा ; निवास करून असते.
(कालादर्श)
🟣 या कारणामुळे नरकास भिणा-यांनी उषःकाळी चंद्रोऽदयी प्रयत्न पूर्वक सुगंधी तिळतेलाने युक्त मंगल असे *”तैलाऽभ्यंग”* स्नान करावे.
(हेमाद्री-निर्णयामृत & पद्मपुराण)
🟣 या पहाटे “तैलाऽभ्यंग” युक्त “मंगलस्नान” करणा-यास “यमलोक” दृष्टीस पडत नाही.
(कालादर्श)
जो मनुष्य या चतुर्दशीचे दिवशी पहाटे (अरुणोऽदयी) स्नान करत नाही; त्याचा एक वर्षात उत्पन्न झालेला “धर्म” नष्ट होतो. असे शास्त्रवचन आहे.
(भविष्यपुराण-दिवोदासीय)
🟣 याचा विधी..
卐 पहाटे शौचमुखमार्जन करून आसनावर बसून खालीलप्रमाणे स्नानाचा संकल्प करावा – हातावर (पळीभर) पाणी घेऊन देशकालादींचा उच्चार करावा. *मम नरकभय परिहारार्थं सुगंधी तैलाभ्यंग पूर्वकं मंगल स्नानं करिष्ये।*
असा संकल्प करून;
卐 स्नानाच्या वेळी ( काट्यासहित असलेली) आघाड्याची फांदी घेऊन डोक्यापासून पूर्ण शरीराभोवती तीन वेळा अथवा त्या पेक्षा अधिक वेळा प्रदक्षिणा क्रमाने (उजव्या बाजूने) खालील मंत्राने “पाप निरसनार्थ” फिरवावी.
(पद्मपुराण-मदनरत्न)
मंत्र :- *सीतालोष्टसमायुक्त सकंटक दलान्वित । हरपापं अपामार्ग भ्राम्यमाणः पुनःपुनः ॥*
प्रत्येक वेळी फिरवताना हा मंत्र म्हणावा.
🟣 *अभ्यंगस्नानाचे विशेषः- तिळाच्या तेलात सुगंधी तेल टाकून स्नान करावे.*
*तेल ही संज्ञा फक्त तिळाच्या तेलालाच आहे.बाकीच्या तेलांना “स्नेह” असे संबोधतात.*
*तिळाच्या तेला शिवाय अभ्यंग होऊ शकत नाही.*
🟣 सर्व शरीराव्यतिरिक्त दोन तळपाय , दोन तळहात, दोन कानशिले आणि टाळू या ठिकाणी तेल लावल्यास “अभ्यंग स्नान” होते.
(अन्यथा अभ्यंगस्नानाचे फळ मिळू शकत नाही.)
🟣 हे “अभ्यंगस्नान” *चंद्रोऽदयी* करावे.
(हेमाद्री-निर्णयामृत)
(या २०२४ वर्षीचा
चंद्रोदय :- पहाटे ०५.२५ वाजता आहे.)
🟣 स्नानानंतर संकल्प पूर्वक “यमतर्पण” करावे.
(मदनपारिजात-वृद्धमनु)
आसनावर पूर्वेकडे तोंड करून – बसून – हातावर पळीभर पाणी घेऊन – संकल्प करावा. – *मम नरकभय निरासार्थं श्री यमप्रसाद सिध्यर्थं च नरकचतुर्दश्यां यमतर्पणं करिष्ये।*
या नंतर ज्यांचे वडील जीवित आहेत त्यांनी पूर्वेकडे तोंड करून- सव्याने – सातू मिश्रित पाण्याने “देवतीर्थाने” एका नावाला एक ओंजळ येणे प्रमाणे;
तर ; ज्यांचे वडील हयात नाहियेत त्यांनी दक्षिणेकडे तोंड करून- अपसव्याने – काळेतीळ मिश्रित पाण्याने “पितृतीर्थाने ” एका नावाला तीन ओंजळी पाणी येणे प्रमाणे “यमतर्पण” करावे :-
१} यमं तर्पयामि
२} धर्मराजं तर्पयामि
३} मृत्युं तर्पयामि
४} अंतकं तर्पयामि
५} वैवस्वतं तर्पयामि
६} कालं तर्पयामि
७} सर्वभूतक्षयं तर्पयामि
८} औदुंबरं तर्पयामि
९} दध्नं तर्पयामि
१०} नीलं तर्पयामि
११} परमेष्ठिनं तर्पयामि
१२} वृकोदरं तर्पयामि
१३} चित्रं तर्पयामि
१४} चित्रगुप्तं तर्पयामि
(ब्रह्मपुराण-मदनरत्न)
येणे प्रमाणे “यमतर्पण” करून; पुढील मंत्र दहा वेळा म्हणावा.
मंत्र :-
*यमोनिहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च कालः। भूताधिपो दत्तकृतानुसारी कृतांत मेतत् दशभिर्जपंति ॥*
अनेन तर्पणेन श्रीयमः प्रीयतां..
असे म्हणून हातावरून पळीभर पाणी सोडावे.
🟣 *अशाप्रकारे “यमतर्पण” केल्यास ( चालू वर्षात) अपमृत्यु- रोगराई-शनिपीडा इ.होत नाही अशी मान्यता आहे .*
🟣 या नंतर “मंगलतिलक” लाऊन चांगले वस्त्र – अलंकार धारण करावेत. परिवार मित्रमंडळी आप्तेष्टांसह फराळ करून आनंदाने दिवस व्यतीत करावा.
🟣 या चतुर्दशीचेठायी सायंकाळी घराबाहेर अपमृत्यु निवारणार्थ श्रीयम प्रीत्यर्थ चारवातींचा दिवा दक्षिणेला ज्योत होईल असा लावावा.
(दिवोदासीये)
याचा मंत्र:-
*दत्तोदीपःचतुर्दश्यां नरक प्रीतये मम । चतुर्वर्ति समायुक्तः सर्व पाप अपनुत्तये ॥*
🟣 या दिवशी प्रदोषकाळी; ब्रह्म, विष्णु, शिव इत्यादीकांच्या मंदिरात व मठ, नदीतट, गोशाळा, बाग, मार्ग, वेदपाठशाळा इत्यादी ठिकाणी दीप लावावेत. (स्कंदपुराण-हेमाद्री)
🟣 या चतुर्दशी आणि अमावस्येला प्रदोषकाळी दिवे लावल्याने मनुष्य “यममार्गाच्या अधिकारांपासून” मोकळा होतो.
(ब्रह्मपुराण-दिवोदासीय)
🟣 या दिवशी उडिदाच्या पानांचे (भाजी करून) सेवन केल्यास; मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो.
(लिंगपुराण-दिवोदासीय)
🟣 तूळ राशीला सूर्य गेल्यानंतर चतुर्दशी, अमावस्या या दोन दिवशी प्रदोषकाळी पुरुषांनी हातामध्ये कोलीत, चुडी घेऊन; (भाद्रपदातीलकृष्ण पक्षांपासून आपल्या घरी रहाण्यास आलेल्या) पितरांना (पितृलोकाचा) मार्ग दाखवावा.
(धर्मसिंधू)
याचा मंत्रः-
*अग्निदग्धाश्च ये जीवा येप्यदग्धा: कुले मम । उज्ज्वलत् ज्योतिषा दग्धा: ते यांति परमां गतिम् ॥*
*यमंलोक परित्यज्य आगता ये महालये । उज्ज्वलत् ज्योतिषा वर्त्म प्रपश्यंतु व्रजंतु ते ॥*
🟣 या चतुर्दशीचे दिवशी “नक्तभोजन” केलें असता महाफल सांगितले आहे.
(धर्मसिंधू)
*शुभदीपावली*
———–
वे.शा .सं अमोलशास्त्री जोशी,
श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५
श्रीगुरुदेव दत्त..!
*॥ अल्प परिचय आणि आवाहन ॥*
वेदमूर्ती अमोलशास्त्री राजाराम जोशी.
प्रधानअध्यापक तथा सचिव; श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
______________________
🟣 श्रीनृसिंहसरस्वती पाठशाळा, श्रीक्षेत्र देवाचीआळंदी. येथे एक तप (बारा वर्षे) गुरूगृही वेदाध्ययन केले.
🟣 गुरुजींच्या आज्ञेने आणि परिजनांच्या त्यागपूर्ण सहयोगाने गत २२ वर्षांपासून; आजतागायत श्रुतिगंध वेदपाठशाळा बीड च्या माध्यमातून अविरत वेदाऽध्यापनाचे कार्य चालू आहे.
🟣 अनेक प्रकारच्या वेदपरिक्षा उत्तीर्ण असून अनेक पुरस्कार प्राप्त आहेत.
🟣 श्रुतिगंध वेदपाठशाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी भारतातील अनेक मान्यताप्राप्त परीक्षेत उत्तुंग यशप्राप्ती करून;विद्वान झालेले आहेत.
🟣असे विद्वान झालेले विद्यार्थी देखील ; वेदअध्यापनाचे कार्य करत आहेत.
🟣अनेक वैदिक सम्मेलनांमध्ये
सक्रिय सहभाग.
🟣 समाजातील सर्व वयोगटातील सर्वसमावेशक संस्कृत शिक्षणार्थींसाठी *ऑनलाईन संस्कृत अध्ययनाचे* कार्य चालू झालेले असून;पहिल्या बॅच ची परीक्षा यशस्वीपणे संपन्न झालेली आहे.
🟣 *या श्रुतिगंध वेदपाठशाळेत; वेद शिक्षण ऑफलाईन तर संस्कृत शिक्षण ऑनलाईन उपलब्ध आहे.*
🟣 *वेदाऽध्ययनासाठी इच्छुक शिक्षणार्थींना अन्न,वस्त्र, निवारा या सोबत च निःशुल्क प्रवेश चालू आहे.*
🟣 *ऑनलाईन संस्कृत शिक्षणार्थींसाठी अत्यल्प मूल्यात सशुल्क अध्ययन उपलब्ध आहे.*
🟣 *इच्छुक शिक्षणार्थींनी ९५११८६९१५५ या क्रमांकावर संपर्क करून; अवश्य लाभ घ्यावा.*
श्रीगुरुदेव दत्त..!