पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल चक्क विमानाने काढण्यात आली होती.गेल्याच वर्षी शाळेचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव संपन्न झाला. त्याचे औचित्य साधून शाळेच्या इतिहासाचे लेखन करण्यात आले होते. तेव्हा नवीन मराठी शाळेच्या इतिहासात ४८ वर्षांपूर्वी पुणे ते मुंबई अशी विमान सहल काढण्यात आली होती* एका मराठी शाळेची सहल विमानाने जाते हा त्याकाळी पुणे शहरात सर्वांच्या औत्सुक्याचा व चर्चेचा विषय ठरला होता. याच पार्श्वभूमीवर पालक संघाच्या सहकार्याने या विमानसहलीचे आयोजन करण्यात आले असे मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मंगळवार दिनांक २४/०९/२०२४ ते शुक्रवार दिनांक २७/०९/२०२४ या चार दिवसांच्या काळात अतिशय व्यवस्थित बारकाईने केलेल्या नियोजनामुळे ही शैक्षणिक सहल उत्साहात पार पडली. इयत्ता चौथीचे शंभर विद्यार्थी व शाळेतील २५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुणे ते हैदराबाद असा विमानाचा प्रवास करून हैदराबाद येथे गेले.
पहिल्या दिवशी लुम्बिनी पार्क, हुसेन सागर तलाव व गौतम बुद्धांचा भव्य पुतळा व सुप्रसिध्द लेझरशो, दुसऱ्या दिवशी रामोजी फिल्मसिटी, पोचमपल्ली गाव, तिसऱ्या दिवशी बिर्ला मंदिर, सालारजंग म्युझियम, चारमिनार, नेहरू झूऑलॉजिकल पार्क, गोवळकोंडा किल्ला, स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी अशी सर्व ठिकाणे नियोजनानुसार विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली.
चौथ्या दिवशी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी विविध नृत्ये सादर केली.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मान्यवर पदाधिकारी व शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने, श्रद्धा टुरिझमचे व्यवस्थापक व संचालक संदीप देशपांडे यांच्या सहकार्याने ही सहल सुखरूपपणे संपन्न झाली. सहलीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे व प्रशासकीय बाबी याचे नियोजन अतिशय बारकाईने करण्यात आले होते.
ज्येष्ठ शिक्षक तनुजा तिकोने,धनंजय तळपे,सहल विभाग प्रमुख वैशाली जाधव,प्रिया मंडलिक, पालक संघ उपाध्यक्ष शशांक दत्तवाडकर, पालक संघाच्या डॉक्टर सौम्या कुलकर्णी यांनी आयोजन सहाय्य केले.
बरेच विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या आयुष्यातील हा पहिला विमान प्रवास नवीन मराठी शाळेच्या सहाय्याने अतिशय अविस्मरणीय ठरला अश्या भावना व्यक्त केल्या.
सहलीच्या या कालावधीत शाळेतील इतर सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास ही शाळेतील काही शिक्षक व पालक संघ यांच्या सहकार्याने नियोजनानुसार व्यवस्थित घेण्यात आला. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या नवीन मराठी शाळेच्या विमान सहलीच्या उपक्रमाचे सर्वांकडून कौतुक करण्यात आले.