

बीड (प्रतिनिधी ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीड येथे अमळनेर (भां) ते बीड नवीन रेल्वे मार्गाचे उदघाटन आणि बीड ते अहिल्यानगर ट्रेनचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर बीडमध्ये रेल्वे सुरू होणे हा जनतेसाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. स्व. गोपीनाथराव मुंडे आणि माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांनी या रेल्वेचे स्वप्न पाहिले होते. विशेषतः स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी बीडच्या रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठा संघर्ष केला. आज स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न साकार झाले असून, ही रेल्वे म्हणजे त्यांना दिलेली खरी आदरांजली आहे.

2014 नंतर केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे निधी उपलब्ध करून या प्रकल्पाला गती दिली. मागील 10 वर्षांत मोदी सरकारने मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी ₹21,000 कोटी दिले, तर त्यापूर्वीच्या 10 वर्षांत केवळ ₹450 कोटी मिळाले होते. आज या धोरणात्मक पाठबळामुळे बीडसह मराठवाड्यातील जनतेचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होत आहे. रेल्वे येणे म्हणजे फक्त गाडी येणे नव्हे, तर त्या माध्यमातून विकासाची वाहिनी पोहोचते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठवाड्याच्या वाट्याचे 23 टीएमसी पाणी आष्टीपर्यंत आणले आहे. आता कृष्णा खोऱ्यातील पुराचे 36 टीएमसी पाणी उजनीमध्ये आणून तेथून मराठवाड्यापर्यंत आणण्याचे काम सुरू केले जाईल. तसेच, उल्हास खोऱ्यातील 54 टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणून मराठवाड्यामध्ये पाण्याचे जाळे निर्माण केले जाईल. यामार्फत मराठवाड्यातील दुष्काळ हा भूतकाळ करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन असून, याच दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी हा ऐतिहासिक रेल्वे प्रकल्प बीडकरांच्या सेवेत अर्पण होत असल्याने आजचा दिवस विशेष असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.






