
बीड दि.७ (प्रतिनिधी):- बीड शहराची जलधारा असलेली बिंदुसरा नदीला आवळला गेलेला अस्वच्छतेचा फास ना.अजितदादांनी सोडविला आणि तब्बल २५ वर्षांनंतर बिंदुसरा नदीने मोकळा श्वास घेतला. ना.अजितदादांनी तातडीने बिंदुसरा नदी स्वच्छतेच्या कामासाठी तातडीने यंत्रणा उभी करून दिली. त्यामुळेच बिंदुसरा नदीची स्वच्छता करणे शक्य झाले आहे. बिंदुसरा नदीची स्वच्छता झाल्यामुळे बीड शहरात पुराचा धोका कमी झाला आहे. सोबतच बीड शहरात पाणी साठवणूक करण्यासाठीही व्यवस्था झाली आहे. त्याबद्दल बीड शहरवीसीयांच्या वतीने आ.संदीप क्षीरसागर यांनी ना.अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.

बीड शहरातून बिंदुसरा नदी वाहते. परंतु गेल्या २५ वर्षांपासून या नदीच्या संवर्धनासाठी कसल्याही प्रकारचे काम झाले नव्हते त्यामुळे बीड शहर आणि तालुक्याची जलधारा असलेली बिंदुसरा नदीची अतिशय वाईट अवस्था झाली होती. बीड शहरात पावसाळ्याच्या काळात पुराचा धोका टाळण्यासाठी नदीची स्वच्छता होणे अत्यंत गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊन आ.संदीप क्षीरसागर यांच्या मागणीनुसार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांनी तातडीने यंत्रणा उभी करून दिली. विशेष म्हणजे या महत्वाच्या कामासाठी कसलीही निविदा प्रक्रिया वगैरे वेळ लागणार्या प्रक्रियेतून न जाता आपल्या स्तरावरूनच ना.अजित दादांनी यंत्रणा कामाला लावली. ना.अजितदादांच्या निर्देशावरून २० मे २०२५ रोजी मा. जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासन, बीड नगरपालिका प्रशासन आदी कामाला लागले आणि बिंदुसरा नदीची स्वच्छता मोहीम सुरू झाली. गेल्या १७ दिवसांमध्ये अखंडितपणे नदीची स्वच्छता करण्याचे काम सुरू होते. शेवटी ना.अजित दादांमुळेच हे शक्य झाले. ना.दादांच्या सूचनेवरून शासकीय विभाग, विविध सामाजिक संस्था आणि प्रशासकीय यंत्रणा यांनी जोमाने काम करत बिंदुसरा नदीला अस्वच्छतेच्या विळख्यातून बाहेर काढले. बिंदुसरा नदीची स्वच्छता झाल्यामुळे गेल्या आठवड्यात पूरपरिस्थीती निर्माण होण्यासारखी अतिवृष्टी झाल्यानंतरही बीड शहराला पूराचा धोका झाला नाही. सोबतच बिंदुसरा धारणाच्या मोठ्या चादरीवरून पाणी वाहीले तरीही बीड शहरात कुठेही पाणी शिरले नाही. ही अतिशय मोठी आणि समाधानकारक बाब आहे. यापुढील काळातही बीब शहराला बिंदुसरा नदीच्या स्वच्छतेमुळे पुराचा धोका अतिशय कमी झाला आहे. याबद्दल ना.अजिदादांचे बीडकर कायम ऋणी असतील अशी भावना आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी आणि सर्वच सहभागी यंत्रणांचेही आभार- आ.संदीप क्षीरसागर
दि.२० मे रोजी बिंदुसरा नदी स्वच्छता आणि खोलीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सलग आजपर्यंत १७ दिवसांच्या स्वच्छता मोहीमेत मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक यंत्रणांनी सहभाग नोंदवला. नगरपालिका प्रशासन, महसूल प्रशासन, जायकवाडी पाटबंधारे विभाग यांच्यासह भारतीय जैन संघटना, जलसंपदा विभाग, नाम फाउंडेशन यांनीही स्वेच्छेने सहभाग घेतला होता. सर्वांच्या सहकार्यामुळेच बिंदुसरा नदीचे स्वच्छताकाम पूर्णत्वास जाऊ शकले. याबद्दल मा.जिल्हाधिकारी आणि बिंदुसरा नदीच्या स्वच्छता मोहीमेत सहभागी झालेल्या सर्व यंत्रणांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी आभार व्यक्त केले आहेत.