
बीड (प्रतिनिधी)बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे.तत्पूर्वी त्यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत,खंडणी मागणे, कमरेला पिस्तुल लावून रील बनवणे आता महाग पडेल असे धंदे कराल तर सरळ मोक्का लावील असा इशाराच त्यांनी दिला आहे. आगामी काळात बीड जिल्ह्यात दर्जेदार कामे होतील असा विश्वास देखील अजित पवार यांनी दिला आहे.
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवारांचे स्वागत केले. आपल्या पहिल्याच दौऱ्यात अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना जर वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नसल्याचा इशारा दिला आहे. विकासकामे करताना कुणी खंडणी मागता कामा नये, अन्यथा मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही असा थेट इशाराच अजितदादांनी दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बीडमध्ये आगमन झाले. पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवारांचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.ना. धनंजय मुंडेदेखील यावेळी उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी म्हटले की, माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. कुठली काम मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे यावर माझा भर असतो. या कामांमध्ये जर वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे की जवळचा लांबचा हे पाहणार नाही.
अजित पवारांनी पुढं म्हटले की, मी सगळ्यांना सांगतो विकासाची काम करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नये. माझ्या ते कानावर आल्यानंतर मोक्का लावायला मागेपुढे पाहणार नाही .
काम करताना चारित्र्य स्वच्छ ठेवा, दृष्ट प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला राहता कामा नये असं सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं. सरड्यासारखे रंग बदलणारे लोक सगळीकडेच असतात असं मार्मिक भाष्य करत दादांनी नाव न घेता राजकीय नेत्यांना घणाघाती टोला लगावला आहे., काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिले आहेत. त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे. मी भेदभाव करत नाही. पण जर चुकीच्या पद्धती पूर्वापार चालत आलेले आहेत त्याला कुठेतरी आळा घातलाच गेला पाहिजे असेही त्यांनी म्हटले. बंदुका दाखवणारे, त्याचे रील्स बनवणाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.