एक लक्ष-मुद्रा भगवंताची……..
काल श्रीमदज्जनीजनार्दन स्वामी पाटांगण संस्थानचा वार्षिक महोत्सव संपन्न झाला,काल धर्मगुरू अमृत आश्रम स्वामी महाराज यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन झाले आणि त्यानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला तर आज पहाटे संस्थांनाधीपती श्री.विनायकमहाराज यांचे लळीताचे कीर्तन संपन्न झाले.यानिमित्ताने जेष्ठ पत्रकार प्रमोद कुलकर्णी यांनी व्यक्त केलेल्या भावना…..
एक लक्ष- मुद्रा भगवंताची..
पुण्यस्थान -भुमी जनीजनार्दनाची..
एक लक्ष मुद्रा म्हणजे आपण अर्थ घेतो तो, एक लाख मुद्रा म्हणजे चलन- पैसा -नाणी. मुद्रा म्हणजे पैसा त्यामुळे खरेदी विक्रीचा व्यवहार केला जातो, त्या देशाची जशी मुद्रा तसा व्यवहार होतो, ती सरकारी व्यवस्था बनते. भारत देशाचा रुपया ही मुद्रा आहे .
इतिहासात राजेशाही व्यवस्थित ही हिशोबाची कामे कुलकर्णी करत असत किंवा “हिशोबनीस म्हणजे कुळकर्णी” ही व्यवस्था होती. सुमारे चारशे वर्षांपूर्वीच्या काळातील जनीजनार्दन यांचे घराणे हे आदिलशहाच्या दरबारी हे काम करत असत, जनीजनार्दनांची विद्वत्ता पाहून मंत्री पदाची जबाबदारी त्यांना मिळाली होती, त्या लौकिकास ते पात्र ठरत असतानाच राज्यात मोठा भीषण दुष्काळ पडला होता म्हणून रयतेसाठी म्हणजे जनसामान्यासाठी राज्याची तिजोरी उघडून आधार देण्याचे काम त्यांनी सुरू केले, अन्य- धान्याची कोठारे खुली केली, अशा चांगल्या गोष्टी करत असताना हे न देखवणारे आदिलशहाचे कान भरू लागले आणि नको तसेच घडले. राजाच्या परवानगीशिवाय काम केल्याचा आरोप ठेवत हत्तीच्या पायाखाली देण्याची शिक्षा फर्मावली. जनीजनार्दनांच्या चूक लक्षात आली, चांगले काम केल्याची ही शिक्षा होती. घरावर तुळशी पत्र ठेवून कुटुंबाचा निरोप घेत राज दरबारात हजर होऊन, माझ्यावर काही उपकार करू नका… मला दया क्षमा नको आणि यापुढे चाकरी ही करणार नाही म्हणून राज दरबारात दिलेल्या उत्तराने दरबार आणि राजाच्या देखील चूक लक्षात आली, हे प्रकरण वेगळं आहे, अवघड आहे पुढे चालून झेपणारे नाही हे लक्षात घेऊन शिक्षेची माफी देऊन सुटका केली, पुढे संन्यासाश्रम स्वीकारून पंढरपुराची वाट धरली, आपल्यावर श्रीगणेशाची कृपा आहे तेव्हा गंगामसला येथील गणेशाच्या सेवेत जावं आणि संसारातील दुःखाला सोडून गणेशाच्या चरणी एक चित्त होऊ लागले. स्वतःचे पिंडदान करून संन्यासाश्रमात असताना बीड येथील शहेंशावली परिसरात देशमुख परिवारातील एकाची भेट झाली, एक महान संत विभूती म्हणून ओळख पटल्याने आपण यापुढे इथेच वास्तव्यास राहावे म्हणून पाच अंगणा एवढी जागा देऊ केली, ते म्हणजेच आजचे “पाटांगण” त्या काळच्या कितीतरी लक्ष मुद्रा पेक्षा मोठा आधार त्या काळात मिळाला असावा, पण “एकलक्ष- मुद्रा भगवंताची” हेच आचरण त्याचं होत.
इवलेसे रोप लावले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी म्हणजे 419 वर्षांपूर्वीचे ‘एकलक्ष -मुद्रा भगवंताची” असे संत जनीजनार्दन म्हणजे पैठणच्या नाथाच्या समकालीन, तेवढेच थोर संत आपल्या बीड शहराच्या इतिहासाचे आध्यात्मिक आणि नैतिक वैभव आज लळीताच्या कीर्तनामुळे समजले. संत जनीजनार्दनांचे तेरावे वंशज म्हणून मोठ्या अभिमानाने आणि कृतज्ञता पूर्ण भावनेतून ही परंपरा वै. दादा (धुंडीराज शास्त्री महाराज) यांनी मोठ्या निष्ठेने आणि कष्टाने जोपासली, वृद्धिंगत करण्यासाठी आपलं आयुष्य धर्मकार्यात झिजवले -समर्पित केले, त्यांचे दर्शन मी घेतलेले आहे, तीच परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी त्याच शक्तीने आणि भक्तीने, १४ वे वंशज श्री विनायक महाराज पुढे काम करत आहेत, कमालीची विनम्रता आणि भगवंतावरील श्रद्धा, आचरणातील शुद्धता पुढेही बीडच्या धार्मिक नावलौकिकात आणि नैतिकता, सात्विकता, समरसतेचे धडे घेत राहील यासाठी या उत्सवाचे मला जास्त महत्त्व वाटते – पटते.
सप्ताहाच्या समारोपातील काल्याच्या कीर्तनातून धर्माचार्य अमृताश्रमस्वामी यांनी “काला” म्हणजे भगवंतांनी समरसतेसाठीची दिसलेली शिकवण. कोणताही भेदभाव न बाळगता भगवंताशी एकरूप होण्यासाठी चा मार्ग,जो सर्व संत, महंतांनी सांगितला आहे, तोच सर्वांनी अंगीकारावा हा महत्त्वपूर्ण उपदेश दिला.
*”सद्गुरु वाचोनी सापडेना सोय”* या सार्थ अभंगाप्रमाणे देव भेटण्यासाठी, देव कळण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता आणि कृपा जास्त महत्त्वाची असते. सद्गुरु हे परिसा सारखे लोखंडाचे सोनं करतात ही उपमा तोकडी आहे , शिष्य आपला सारखाच होण्यासाठी सद्गुरु काम करतात, हे जनसामान्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी सद्गुरु शिवाय सोय नाही, देवाच्या भेटीसाठी सद्गुरु चे महत्व किती मोठे आहे? हे सप्रमाण भागवताचार्य ह.भ.प. महेशगुरुजी पांडव महाराजांनी लळीताप्रसंगी विशद केले.
जनीजनार्दन वार्षिक उत्सवातील हजेरी म्हणजेच भगवंताशी जवळीक होत असल्याची अनुभूती प्राप्त होत असते अशीच माझी भावना आणि सर्वांच्या देखील असाव्यात म्हणून उत्सवाला मोठा सहभाग आणि उत्साह दिसून येत आहे…
चरणी नम्र वंदन…
प्रमोद कुलकर्णी पत्रकार बीड
(९४०३९०४६५१)
दि.१७/११/२४.