
पुणे-
“याला पाडा त्याला गाडा ही कुठली संस्कृती? असा सवाल भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला.
कुणीही कडुलिंब, बाभळीला नाही तर आंब्याच्याच झाडाला दगडे मारतात. पैलवानाने व्यथित होऊन नाही तर बलवान होऊन राजकारण करायचे आहे. बल बुद्धी आणि विद्या हे सर्व काही एका पैलवानाकडेच असते. असा गैरसमज आहे की पैलवानाला फक्त भावना कळतात नव्हे, तर पैलवान कोणत्या वेळेला शरीराचा कोणता स्नायू वापरून शत्रूला चिटपट करायचे हे ठरवत असतो. म्हणून आमदार महेश लांडगे यांनी राजकीय पैलवान होऊन टीकेला उत्तर न देता केलेले काम दाखवत आहेत. त्यामुळे विरोधक चितपट झाल्याशिवाय राहणार नाही, असेही मुंडे म्हणाल्या.
”अरे जो काम करतो त्याला निवडून आणण्याचा सर्वस्वी अधिकार नागरिकांचा आहे”. काम करणाऱ्या माणसाला राजकारणात टिकून ठेवण्याची जबाबदारी जनतेची नाही का? असे सवालही त्यांनी यावेळी नागरिकांना उद्देशून केला. महायुतीच्या भोसरी विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ दिघी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.राज्यघटना भवन, न्यायालय संकुल, संतपीठ यांसारखी कामे करून नागरिकांच्या हृदयात महेश लांडगे यांनी स्थान मिळवले आहे. कार्यकर्त्यांनी नागरिकांना या कामाची आठवण करून देणे गरजेचे आहे. सद्या महाविकास आघाडीकडे बोलायला मुदत नाही. त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल अशी त्यांची निवडणुकीतील जुमलेबाजी सुरू आहे. त्यांच्याकडे विकासाचा संकल्प राहिलेला नाही. राजकारणात हा सूर्य आणि हा जयद्रथ असेच काम दाखवावे लागते. जे काम महेश लांडगे यांनी केलेले आहे. या विकासाच्या कामावरच यंदा त्यांची हॅट्रिक निश्चित आहे, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.