महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले असून हा विषय टेक्निकल असून किचकट आहे,यासाठी लोकसभेतच कायदा करावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश घ्यावे लागतील.हे प्रत्येक राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना माहीत आहे.फक्त महाराष्ट्रात हे धोरण आणले तर इतर राज्यात पण अशीच मागणी होईल.मी मनोज जरांगे पाटील यांना सांगितली आहे.
“मराठा समाजाचा पहिला मोर्चा मुंबईत आला होअसता. त्याच मोर्चाला सामोरे कोण कोण गेले होते. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोकं होते. विधीमंडळ अधिवेशन सुरू होतं. सर्वांनी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ सांगितलं. मग अडवलं कुणी होतं. मग आतापर्यंत का नाही दिलं. कधी यांची तर कधी त्यांची सत्ता आली. या गोष्टीला २० वर्ष झाली. इतक्या वर्षात फक्त तुम्हाला झुलवत ठेवलं. राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यात मराठा समाजाचे मोर्चे निघाले. इतके शिस्तबद्ध मोर्चे मी इतिहासात पाहिले नाही. कोणी पुढारी नव्हता. पण सर्व जिल्ह्यातून मोर्चे शिस्तबद्ध निघाले. त्या मोर्चांचं काय झालं. का नाही अजूनपर्यंत आरक्षण मिळालं”, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थितीत केला.
“मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतात. म्हणतात निवडणूक लढवू. नंतर म्हणतात नाही लढणार. पाडणार. तुम्हाला लढायचं तर लढा नाही तर नका लढू. प्रश्न एवढाच आहे की, आरक्षण कसं देणार ते सांगा. हे फक्त तुम्हाला झुलवत आहेत. राजकीय पक्ष फक्त भूलथापा देत आहेत. कारण अशा प्रकारचं आरक्षण मिळूच शकत नाही. मी फक्त सत्य परिस्थिती मांडतो”, असे राज ठाकरेंनी म्हटले.
“मी जरांगे पाटलांना भेटलो तेव्हा त्यांच्यासमोर हा विषय मांडला . हा टेक्निकल विषय आहे. किचकट आहे. लोकसभेत कायदा बदलावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश घ्यावे लागेल आणि हा फक्त राज्याचा विषय नाही. महाराष्ट्रासाठी असं धोरण आखायला गेले तर प्रत्येक राज्यातील जाती उठतील. ते कुणालाही परवडणार नाही. हे होणार नाही हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना माहीत आहे. आरक्षण देणार जे सांगतात त्यांना विचारा आरक्षण कसं देणार”, असेही राज ठाकरे म्हणाले.