बीड– कुणाच्याही मनी न मानसी असणारी धक्कादायक माघार अपक्ष उमेदवार तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची ठरली आहे .आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार आहोत याची थोडीही कल्पना त्यांनी त्यांच्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना आणि निकटवर्ती यांनाही दिली नाही .
चिन्ह घेण्यासाठी म्हणून निवडणूक कार्यालयात जायचे आहे असे सांगून जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठीचा अर्ज दिला आणि एकच खळबळ उडाली .उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर फारसा कोणाशीही संवाद न साधता ते पुण्याला निघून गेले. त्यांना माघार घेण्यासाठी नेमकी कोणी विनंती केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण त्यांनी हा निर्णय का घेतला हे त्यांच्याशिवाय कुणालाही माहित नाही .कोणी म्हणाले देवेंद्र फडणवीसांचा फोन आल्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले तर कोणी सांगितले की एका सर्वे मध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे .एकूणच त्यांच्या माघारी बद्दल तर्कवितर्क लढवले जात असताना समर्थक मात्र सैरभर झाले आहेत.यापुढे ते काय भूमिका घेतात यावर बीडची लढत कुणाच्या बाजूने झुकते हे ठरण्याची शक्यता आहे.
बीडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. ज्योती मेटे , अनिल जगताप यांनी अर्ज कायम ठेवला आहे. आष्टी विधानसभा मतदार संघात यापूर्वीच महायुतीत मैत्रीपुर्ण लढत स्पष्ट झाली आहे. भाजपने सुरेश धस तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमदार बाळासाहेब आजबे यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. येथून भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.
गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी भाजपचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. पण, राष्ट्रवादी कॉंग्रेस शेतकरी आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे यांनी स्वराज्य पक्षाकडून उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. बीडमध्ये महायुतीची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला जाऊन डॉ. योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी भेटली आहे. येथून शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप अपक्ष रिंगणात आहेत.
माजलगावमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रकाश सोळंके यांना उमेदवारी दिली आहे. येथून राष्ट्रवादीचे माधव निर्मळ तसेच भाजपचे बाबरी मुंडे यांनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले रमेश आडसकर यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
बीडमधून माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनीही माघार घेतली. केजमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी माघार घेतली तर परळीतून राष्ट्रवादीतून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या राजाभाऊ फड यांनीही माघार घेतली. एकूणच बीड जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी बंडखोरीचे झाल्याचे चित्र आहे.