
निवडक मतदारसंघात उमेदवार देण्याच्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया “देतांना जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला,ते म्हणाले एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके उमेदवार देऊ शकले नाहीत.
हाके म्हणाले, मनोज जरांगे हे औकातीवर आले आहेत. 130 मतदारसंघामध्ये पाडू,लोळवू, सुपडा साफ करू अशी त्यांची भाषा होती.मात्र, आमदार पाडण्याची भाषा करणारे जरांगे यांना एका हाताच्या बोटावर मोजण्या इतके उमेदवार देता आले नाहीत.
बारामती येथून शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटलांना दम दिला असल्यामुळे त्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. त्यामुळे जरांगे हे एका हाताच्या बोटावर मोजण्या इतपत देखील उमेदवार देतील असं मला वाटत नाही, असा टोला देखील हाके यांनी जरांगेंना लगावला.
ज्या ज्या लोकांनी जरांगे पाटलांना आपलं समर्थन दिलं, पैसा दिला, माणसं दिली आणि लेखी पत्र दिली त्या त्या सर्व नेत्यांना आम्ही जाब विचारणार आहोत. आणि ज्या पक्षांना आणि उमेदवारांना याबाबत उत्तर देता येणार नाही. त्यांनी त्यांना ओबीसींनी मतदान करू नये, असे आवाहन आम्ही करणार असल्याचं हाके यांनी सांगितले.
जरांगे पाटील यांना माझी विनंती आहे की जे नेतेमंडळी संविधानाची शपथ घेऊन देखील आपल्या मतावर ठाम राहत नाहीत. त्यांच्याकडून स्टॅम्प पेपरवरती लिहून काही होणार नाही. तुम्ही ताम्रपट अथवा शिलालेखावर राजकारण्यांकडून लिहून घ्यावे. कारण ते कोणत्याही मतावर ठाम नसतात, अशी खिल्ली हाके यांनी जरांगेंच्या स्टॅपपेपर लिहून घेण्याच्या वक्तव्याची उडवली.