नमस्कार…!
दि.०३/११/२०२४*॥ यमद्वितीया ॥*
🟣 कार्तिक शुद्ध द्वितीयेला अपराण्ह काळी यमुना नदीत स्नान करून; यमाचे पूजन करणारा “यमलोक” पहात नाही.
ही पूजा करणा-यावर यम संतुष्ट होऊन; पूजाकर्त्यास इच्छित फल देतो.
(स्कंदपुराण-हेमाद्री)
🟣या दिवशी चित्रगुप्त, यमदूत आणि यमाचे पूजन करून; नरकचतुर्दशीला सांगितल्याप्रमाणे यमाच्या १४ नावांनी तर्पण आणि अर्घ्यदान करावे.
(ज्योतिषग्रंथ)
🟣या द्वितीयेला यमुनेने स्वगृही (आपल्या भावाचे) यमाचे पूजन करून; भोजन घातले म्हणून ही द्वितीया “यमद्वितीया” या नावाने प्रसिद्ध झाली.
करिता; या दिवशी पुरुषांनी स्वगृही भोजन न करता प्रीतीने भगिनीच्या हातचे पुष्टिकारक असे भोजन करावे.आणि भगिनीला यथाशास्त्र दानेही द्यावी. बहीण मोठी असल्यास; तिचे पूजनही करावे.
(भविष्य पुराण)
🟣 भगिन्याऽभावे चुलत -मामे- मावस-आते बहीण अथवा मानलेल्या बहिणीच्या हातचे भोजन करावे.
卐 यात ही विशेष म्हणजे;
१} श्रावणातील द्वितीयेला चुलत बहिणीच्या हस्ते..
२} भाद्रपदातील द्वितीयेला आते-मामेबहिणीकडे…
३}आश्विनातील द्वितीयेला मावसबहिणीकडे..
४} कार्तिक द्वितीयेला सख्ख्या बहिणीकडे..
येणेप्रमाणे भोजनाऽदींचे नियोजन करावे..
( हेमाद्रि )
🟣 भावाने अलंकार, वस्त्र, अन्न अथवा द्रव्य इ. देवून बहिणीचा सत्कार करावा.
जो व्यक्ती येणेप्रमाणे पूजा आणि भोजन- दान आदी करितो त्याला धन-धान्य, सुख, रत्ने आदी प्राप्त होतात.
(व्रतोऽद्यापनचंद्रिका & हेमाद्री)
🟣 जी स्त्री; या द्वितीयेला भावाला भोजन, वस्त्र, तांबूल आदी देऊन पूजन करिते; तिला “वैधव्य” प्राप्त होत नाही. तसेच; भावाचे आयुष्य चिरकाल होईल.
(ब्रह्मांड पुराण)
🟣 येणेप्रमाणे न केल्यास; सप्तजन्म पर्यंत “भ्रातृनाश” होतो.
(धर्मसिंधू & व्रतोऽद्यापनचंद्रिका )
🟣 अथ यमपूजा पद्धती:-
देशकलाचे कथन करून; (भावाने) संकल्प करावा : –
मम श्रीयम प्रीत्यर्थं यमादि देवतानां पूजनं करिष्ये ।
असा संकल्प करून;
वस्त्रावर तांदूळ घालून त्यावर तीन सुपा-या मांडाव्यात.
त्यावर यम, चित्रगुप्त, यमदूत यांचे आवाहन करावे.
त्या नंतर आवाहित देवतांचे यथाशक्ती पूजन करावे.
त्या नंतर पळी मध्ये पाण्यासहित गंधाक्षतपुष्प घेऊन; पुढील मंत्राने यमाला अर्घ्यदान करावे..
मंत्र:-
एह्येहि मार्तंडज पाशहस्त यमांत कालोक धरामरेश । भ्रातृद्वितीया कृत देवपूजां गृहाणचार्घ्यं भगवन्नमस्ते ॥
🟣 अर्घ्यदानानंतर पुढील मंत्राने यम आणि यमुनेची प्रार्थना करावी…
यमराज प्रार्थना मंत्र :-
धर्मराज नमस्तुभ्यं नमस्ते यमुनाग्रज ।
त्राहिमां किंकरैः सार्धं सूर्यपुत्र नमोस्तुते ॥
यमुना प्रार्थना मंत्र: –
यमस्वसर्नमस्तेस्तु यमुने लोकपूजिते।
वरदा भवमे नित्यं सूर्यपुत्रि नमोस्तुते ॥
असे म्हणून यम आणि यमीला वंदन करावे.
🟣 बहिणीने करावयाचा संकल्प आणि पूजा :-
संकल्प :- मम श्रीयम प्रीतिद्वारा अवैधव्य प्राप्त्यर्थं भ्रातु: आयुरभिवृध्यर्थं च यमपूजनं भ्रातृभोजनं वस्त्रादिभिः तत्पूजनं च करिष्ये ।
असा संकल्प करून ;
भावाने आवाहनादी पूजन केलेल्या; यमादी देवतांना (बहिणीने) गंध अक्षदा पुष्प वाहून; धूप- दीप ओवाळून नैवेद्य करावा.
🟣 या नंतर (बहिणीने) भावाला आसनावर बसवून; गंधाऽक्षत पुष्पाने पूजन करावे आणि पुढीलप्रमाणे संकल्प पूर्वक; मिष्टान्नाचे भोजन घालावे.
🟣 जेवण घालण्यापूर्वी करावयाचा संकल्प :-
श्रीयम प्रसादात् मम अवैधव्य प्राप्त्यर्थं भ्रातुः आयुरभिवृद्ध्यर्थं च भ्रातृ भोजनेन श्रीयमः प्रीयताम् नमम !
प्रार्थना मंत्र:-
भ्रातः तवानुजाता (बहीण मोठी असेल तर;“तवाग्रजा” असे म्हणावे.) अहं भुंक्ष्व भोज्यं इदं शुभं ।
प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषतः ॥
येणेप्रमाणे भावाला भोजन करवून; तांबूल द्यावा.
🟣 भोजनोत्तर भावाच्या आयुष्यवृद्धी करिता; मांडलेल्या देवतांजवळ जाऊन; मार्कंडेयांची पुढील मंत्राने प्रार्थना करावी …
मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीवन ।
चिरंजीवी यथैवत्वं तथामे भ्रातरं कुरु ॥
अशाप्रकारे पूजा तर्पण, अर्घ्य,भोजन,प्रार्थना आदी झाल्यावर; कर्म परमेश्वराला अर्पण करावे.
(कृत्यरत्नावलिः)
🟣 आवाहित देवतांना नीरांजन विधी करून; देवतांचे विसर्जन करावे.
नंतर भावाला ओवाळून झाल्यावर; भावाने बहिणीला वस्त्र अलंकार सम्भावना आदी देऊन; सत्कार करावा.
लहान भावंडाने मोठ्याला नमस्कार करावा.
शुभदीपावली
वे.शा.सं.अमोलशास्त्री जोशी,
श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५
श्रीगुरुदेव दत्त…!