मुंबई– जे आम्ही बोलत होतो तेच जर झाले तर जरांगे पाटील यांचा उद्देश स्पष्ट होईल .त्यांची निःपक्षपाती भूमिका मराठा समाजासाठी आहे की राजकीय आहे हे स्पष्ट होईल असे भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी म्हंटले आहे. आहे उद्या 3 नोव्हेंबरला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे आपली भूमिका जाहीर करणार आहेत, या पार्श्वभूमीवर आ. प्रवीण दरेकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना अपक्ष अर्ज भरण्यास सांगितले होते. अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उद्या रविवारी 3 नोव्हेंबर रोजी जरांगे यांनी सर्व उमेदवार यांना अंतरवाली सराटीत बोलावले.उद्याच्या बैठकीत कोणत्या जागी कोण उमेदवार असेल हे ठरवले जाणार आहे.
अर्थात ते उद्या या संदर्भात घोषणा करणार आहेत. महत्वाचे म्हणजे, जरांगे भाजप विरोधात उमेदवार देण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आता, चार तारखेला मनोज जरांगे यांचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल, असे भाजप नेते आमदार प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले, “लोकशाहीमध्ये प्रत्येकालाच निवडणूक लढवण्याचा आणि उमेदवार देण्याचा अधिकार आहे. जरांगे हेदेखील उमेदवार उभे करणार असल्याचे समजते. मात्र, केवळ संकुचित भावनेने केवळ भारतीय जनता पार्टीसमोरच उमेदवार उभे केले गेले अथवा भाजपचे उमेदवार आहेत, तेथे पाडापाडीच्या उद्देशाने दुसऱ्या महाविकास आघाडीला समर्थन केले, तर जरांगेंचा बोलवता धनी कुणीतरी आहे, हे जे आम्ही पहिल्यापासून बोलत होतो, त्यावर शिक्कामोर्तब होईल.”जरांगे यांच्या हेतूसंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले, “चार तारखेला फॉर्म मागे घेईपर्यंत, कोणत्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत, कोणत्या ठिकाणी नाहीत? ज्या ठिकाणी उभे आहेत, तेथे उमेदवार कोण आहेत? जेथे उभे करणार नाहीत, तेथे उमेदवार कोण आहेत? हे समोर आल्यानंतर, जरांगेंचा नेमका उद्देश काय? त्यांची निष्पक्षपाती भूमिका मराठा समाजासाठी आहे की, आता त्यांची भूमिका पूर्णपणे राजकीय बनली आहे, हे महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल.”