जयदत्त क्षीरसागर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

बीड – मी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा माणूस आहे. या शहराचा नाही तर जिल्ह्याचा व मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी प्रयत्नशिल असेल. सत्ता हे माझं अंतिम साध्य नाही तर साधन आहे. मुलभूत सुविधा पुरविणे हे माझे प्राधान्य आहे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता बीड विधानसभा मतदारसंघाचा आपला अपक्ष उमेदवारी अर्ज साध्या पध्दतीने दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत
जगदीश काळे, रोहीत क्षीरसगर, हेमंत क्षीरसागर, विलास बडगे, दिनकर कदम, अरूण डाके, गंगाधर घुमरे, गणपत डोईफोडे, विलास विधाते, उषा सरवदे, अरूण बोंगाणे, मुखीद लाला, सखाराम मस्के, मनोज मस्के, राणा चौहाण यांच्यासह प्रमुख मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी त्यांनी नवगण राजुरी येथील गणपती व श्री क्षेत्र नारायणगड येथे देव दर्शन घेऊन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, जिवा महाले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, राजमाता अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, श्री संत भगवान बाबा, महात्मा बसवेश्वर, श्री संत गाडगे महाराज, महाराणा प्रताप, राजमाता जिजाऊ माँ साहेब, कृषिरत्न वंसतराव नाईक आदि महापुरूषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले तसेच शहेंशाहवली दर्ग्यास चादर अर्पण केली.
राज्यात सध्या काका-पुतण्यांची लढत आख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे, यात किती काका आणि किती पुतणे हे अंकगणित नाही तर केमेस्ट्री आहे. लोकांना साथ कोणी दिली, लोकांची सेवा कोणी केली हे लोकांना माहिती आहे. कोण-कोण येत आहे ते लोकांना माहित आहे. टोलवाले, मटकेवाले, दारूवाले, गुटख्यावाले, क्लबवाले, पत्त्यावाले असे अनेकजण भावी आमदार होण्याचे स्वप्न पहात आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.