
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली असून ते आज उमेदवारी अर्जही दाखल करणार आहेत. त्यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे उद्या अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणार आहेत तर तिसरे क्षीरसागर डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर सारिका क्षीरसागर या आणखीन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत.
बीडची जागा आपल्या पदरात पडावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हेही आग्रही आहेत ,ही जागा कुणाला सुटते यावर तिसऱ्या क्षीरसागरांचे भवितव्य ठरणार आहे .ही जागा शिवसेनेला सुटली तर माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार ठरू शकतात.
,आता निवडणूक वातावरणाला रंगत येत असून बीड विधानसभेची निवडणूक ही अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे, त्यातच काल उमेदवारी जाहीर होताच विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असून त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे . “आपण अंधारात नव्हे तर उघड उघड जाऊन जरांगे पाटील यांना पाठिंबा मागितला आहे ” असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.