एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सणात काहीसा दिलासा देण्यासाठी सरकारने महामंडळाला ३५० कोटी रुपयांची अर्थसहाय्य मंजूर केले आहे. यामुळे कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सप्टेंबर २०२४ महिन्यासाठी सवलतमूल्याची रक्कम शासनाकडे विनंती केली होती. महामंडळाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने शासनाने या विनंतीला मंजुरी दिली आहे. राज्य शासनाने एसटी महामंडळासाठी ३५० कोटी रुपयांची निधी मंजुरी देऊन दिवाळीपूर्वी ही रक्कम वितरित करण्याचे नियोजन केले आहे. या निधीमुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन आणि इतर सुविधांसाठी मदत मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त या निधी वितरणासाठी प्राधिकृत करण्यात आले आहेत. त्यांच्या कार्यालयातील लेखाधिकारी यांना ही रक्कम एसटी महामंडळास तातडीने वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधी वेतनाची हमी मिळणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी सणाच्या काळात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.