बीड-
महाआघाडीचा उमेदवार ठरल्याशिवाय महायुती बीड विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरवणार नाही असे सांगितले जात आहे. अद्याप बीड विधानसभा मतदारसंघाचा तिढा दोन्हीही मोठ्या आघाड्या सोडवू शकल्या नाही त्यातच बीडचे माजी मंत्री, माजी आमदार, विविध पक्षातील मोठे पदाधिकारी हे सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटलाकडे उमेदवारी मागत आहेत .या पार्श्वभूमीवर बीडमध्ये तिरंगी लढत होईल पण कोणाकोणात हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
बीड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. मध्यंतरीच्या मोठ्या राजकीय उलथापालथीत त्यांनी शरद पवार यांची साथ सोडलेली नाही त्यामुळे उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा संदीप क्षीरसागर यांना विश्वास आहे. तर दुसरीकडे शिवसंग्रामच्या नेत्या तथा दिवंगत आमदार विनायकराव मेटे यांच्या सुविद्य पत्नी ज्योतीताई मेटे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे , त्यांनाही उमेदवारी मिळण्याची अशा आहे यातच काल बीड जिल्ह्यातील बडे प्रस्थ असणारे आणि राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी पार पाडण्याचा मोठा अनुभव गाठीशी असणारे जयदत्त क्षीरसागर ही शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवारांसमोर उमेदवार ठरवण्याच्या बाबतीत मोठा पेच निर्माण झाला आहे.
महायुतीत ही जागा जर शिंदेंच्या शिवसेनेला सुटली तर अनिल जगताप यांचे नाव निश्चित समजण्यात येत आहे पण त्यांनाही मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती बाजीराव चव्हाण यांची उमेदवारीसाठी आव्हान असणार आहे .मात्र जगताप यांचे पारडे सध्यातरी जड आहे , ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली तर डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सारिका क्षीरसागर याही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
तिसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी बीड विधानसभा मतदारसंघातून उमेदवार उभा करण्याचे संकेत दिले आहेत माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे ,भाजपाचे नुकताच जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले राजेंद्र मस्के , पत्रकार भागवत तावरे,बक्षु अमीर शेख ,जरांगे पाटलांच्या आंदोलनात त्यांच्या सतत सोबत असणारे चार्टर्ड अकाउंटंट बी. बी. जाधव हे सुद्धा ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.