नऊ दिवस,नऊ रात्री अव्याहतपणे सायकल प्रवास,नऊ दिवसात पाच हजार किलोमीटर कापण्यात दोन अंध तरुण यशस्वी होणं हे खूप मोठं यश आहे,कुणालाही सांगितले की दररोज चारशे ते साडे चारशे किलोमीटर अंतर सायकलवर हे दोघे पूर्ण करायचे तर अविश्वसनीय वाटेल,या थरारक प्रवासाचे सहभागी प्रवासी ,बीडचे नामांकित हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अनिल बारकुल.त्यांच्याच तोंडातून त्यांनी केलेला हा थरारक प्रवास ऐकला तेव्हा मी आणि प्रमोद कुलकर्णी अवाक झालो. डॉक्टर बारकुल यांनी सांगितले की रेस अक्रॉस इंडिया ही इंडियन ऑइलने प्रायोजित केलेली स्पर्धा जगातील सर्वात कठीण मार्ग आणि प्रवास असणारी स्पर्धा आहे.वर्षांपूर्वी मी कळसुबाईचे शिखर पादाक्रांत केले होते त्या प्रवासात भेटलेल्या एका मित्राने मला याबाबत सविस्तर माहिती दिली होती.तेव्हाच मी या रेसमध्ये भाग घ्यायचे ठरवले होते,माझी या रेसमधील भूमिका ही सपोर्ट स्टाफची होती,मी डॉक्टर होतो,मी वाटाड्या होतो,मी आहारतज्ञ होतो,मी ड्रायव्हरही होतो,सायकल चालवणारे सायकलिस्ट हे अंध होते,यातील एक पूर्ण तर एक 75 टक्के दृष्टिहीन होता,तर त्यांना साहाय्य करणाऱ्यात एक तरुण तर दुसरे चक्क 62 वर्षाचे गृहस्थ होते, आळीपाळीने हे सायकल चालवत असत,पेट्रोल पंपावर फ्रेश होणं एवढीच काय ती जुजबी विश्रांती. सायकलच्या वेगाने सोबतची कार हळूहळू चालवावी लागत असे,चालता चालताच पाणी,फळे,अन्न द्यावे ,घ्यावे लागत होते.काश्मीर टू कन्याकुमारी असा हा थरारक अविश्रांत प्रवास,कुठे वारा, कुठे ऊन,कुठे पाऊस,कुठे गारवा,कुठे भयंकर उष्णता ही निसर्गाची सारी रूपे या पाच हजार किलोमीटरच्या प्रवासात अनुभवण्यास मिळाली.डॉक्टर म्हणाले मला सर्वात आनंद याचा आहे की आदी शंकराचार्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचे अन मार्गाचे मला दर्शन घेता आले.
आदि शंकराचार्य वयाच्या 8 व्या वर्षी सर्व वेदांचे जाणकार झाले होते. त्यांनी भारतभ्रमण करून चारही दिशांना चार पीठांची स्थापना केली. जे आजचे चार धाम आहेत. शंकराचार्यांनी गोवर्धन पुरी मठ (जगन्नाथ पुरी), शृंगेरी पीठ (रामेश्वरम), शारदा मठ (द्वारिका) आणि ज्योतिर्मठ (बद्रीनाथ धाम) स्थापन केले होते.डॉ.बारकुल यांच्या टीमने या रेसमध्ये नववा क्रमांक पटकावला. मुळात ही रेस पूर्ण करणे आणि तेही विक्रमी वेळात हेच सर्वाधिक कौतुकाचे. डॉक्टर एकूण 22 दिवस प्रवासात बाहेर होते,त्यातील 9 दिवस 9 रात्र प्रत्यक्ष प्रवासात,त्यांच्या टीममध्ये एकूण 15 क्रु मेंबर होते,या प्रवासात मला खूप काही अनुभवायला, शिकायला, पहायला मिळाले असे डॉक्टर विनम्रपणे म्हणाले.डॉक्टरांचे अभिनंदन करतांना एकच विनंती केली की,डॉक्टर या अनुभवावर एक पुस्तक लिहाच…