राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौर विजयाताई रहाटकर
यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रहाटकर यापूर्वी 2016 ते 2021 या कालावधीत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. सामाजिक कार्यातील भूमिका लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्याचबरोबर अर्चना मजुमदार यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांच्यावरील भेदभाव आणि हिंसाचार दूर करणे आणि त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी उपलब्ध करून देणे, हे राष्ट्रीय महिला आयोगाचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, रहाटकर यांची या पदावर तीन वर्षे किंवा वयाच्या ६५ वर्षापर्यंत (जे आधीचे असेल) नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आयोगाच्या नवव्या अध्यक्षा असतील. रहाटकर या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षाही राहिल्या आहेत.
याशिवाय, त्यांनी पॉक्सो कायदा, तिहेरी तलाकविरोधी सेल आणि मानवी तस्करीविरोधी युनिटवर लक्ष केंद्रित करून लैंगिक सुधारणांवरही काम केले. रहाटकर यांनी डिजिटल साक्षरता कार्यक्रम सुरू केला आणि महिलांच्या प्रश्नांना वाहिलेले ‘साद’ नावाचे प्रकाशनही सुरू केले. महिला सक्षमीकरणातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय कायदा पुरस्कार आणि राष्ट्रीय साहित्य परिषदेच्या सावित्रीबाई फुले पुरस्काराचा समावेश आहे.