बीड-
पंडितांची म्हणून ओळखली जाणारी गेवराई पवारांचीही होती हे एकदा नव्हे तर दोनदा सिद्ध करणारे आ.लक्ष्मणराव पवार हे यावेळी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरतात की शब्दाला पक्के असणाऱ्या आपल्या लौकिकाला जागून यंदाच्या निवडणुकीतून बाहेर राहतात हे पाहणे गेवराई विधानसभा मतदारसंघासाठी औत्सुक्याचे ठरणार आहे. आ.लक्ष्मणराव पवार म्हणजे शब्दाला जागणारा नेता, एकदा शब्द दिला की कितीही परीक्षेचा प्रसंग येऊ ते त्यापासून कधीच विन्मुख होणार नाहीत ही त्यांची ओळख आहे की याच्या उलट ‘ अगं अगं म्हशी मला कुठे नेशी?’ या म्हणीप्रमाणे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरतात याकडेही गेवराई मतदार संघाचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे.गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत दोनही पंडितांना पराभूत करून गेवराई मतदार संघावर निर्विवाद वर्चस्व राखणारे आमदार म्हणून ख्याती मिळवलेल्या लक्ष्मणराव पवार यांनी गेल्या महिन्यात अचानकपणे आपण स्वतः आणि कुटुंबातील कोणीही सदस्य येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उभे राहणार नाहीत अशी घोषणा केली. भाजप पक्षश्रेष्ठींकडून आपल्याला योग्य ते सहकार्य मिळत नाही, आपल्या मनाचा विरुद्ध गेवराईत अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातात असा आरोपही ही घोषणा करताना पवारांनी केला होता. त्यांच्या या अचानक घेतलेल्या पवित्र्यामुळे त्यांचे समर्थक आश्चर्यचकित झाले होते , त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पवारांच्या घरासमोर जोरदार शक्ती प्रदर्शन करून आ.लक्ष्मण पवार यांनी घेतलेला राजकारण निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली.
संपूर्ण मतदारसंघातूनही पवारांच्या निर्णयाला त्यांच्या समर्थकांनी विरोध करीत विधानसभा निवडणूक लढवण्याची पवारांना गळ घातली . मात्र अलीकडच्या काही दिवसात लक्ष्मणराव पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होत आहे ,या चर्चेचा स्वतः पवार यांनी किंचितही इन्कार केला नाही अथवा याला दुजोराही दिला नाही , मात्र ते आता निवडणूक रिंगणात उतरतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटू लागला आहे .आ.लक्ष्मणराव पवार सर्वप्रथम जेव्हा निवडून आले त्या निवडणुकीपासून त्यांनी अमरसिंह पंडित आणि बदामराव पंडित या दोन्ही पंडित यांच्याशी आपण राजकीय अथवा कुठलाही संबंध ठेवणार नाही असे जाहीर सांगितले होते.
गेली दहा वर्षे कसोटीच्या प्रसंगातही त्यांनी हे खरे करून दाखवले आणि निर्धार पाळला ,कोणत्याही पंडिताशी त्यांनी राजकीय संपर्क ठेवला नाही यामुळे ‘बोले तैसा चाले’अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. त्यांनी मतदारसंघात विकास कामांना प्राधान्य दिले . विकासकामांमध्ये चांगल्या प्रतीचे काम करून घेण्याचा त्यांचा आग्रह होता आणि मतदारसंघात त्यांनी केलेल्या दर्जेदार विकासकामाकडे पाहिल्यास त्यांच्या कार्यक्षमतेचा परिचय होतो .मात्र अचानक त्यांनी सक्रिय राजकारणातून थांबण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे. त्यांच्या या निर्णयाला भाजपकडूनही फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही ,भाजपकडून कुणीही त्यांची मनधरणी करण्यास पुढे आलेला नाही ,या पार्श्वभूमीवर ते आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)मध्ये जाण्याचा निर्णय घेतात की निवडणुकीपासून दूर राहतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.