बीड-
तिकीट मिळो आठवस न मिळो यावेळच्या विधानसभा निवडणुकीला उभे राहायचेच आणि जिंकायचे असा निर्धार क्षीरसागर घराण्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर , विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आणि युवा नेते तथा नगराध्यक्ष डॉक्टर भरतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी केला आहे.यामुळे ही निवडणूक अभूतपूर्व ठरणार आहे. बीड विधानसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टरचा लाभ घेण्यासाठी मराठा समाजातील नेते आणि आंदोलनातील सक्रिय कार्यकर्तेही उत्सुक आहेत त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीने लढली जाईल
विधानसभेचा बिगुल वाजला असून बीड विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे, विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे उमेदवार असतील असे वाटत असले तरी त्यांचे राजकारणातील मुरब्बी काका जयदत्त क्षीरसागर हे सुद्धा शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनीही अजित पवार गटाकडे उमेदवारी मागितली आहे त्यात बीडची जागा ही यापूर्वी युतीमध्ये शिवसेनेकडे तर आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडे होती हे दोनही पक्ष फुटले असून या पक्षांना आपलाच या मतदार संघावर हक्क आहे असे वाटते. त्यातून आता या दोन्ही महत्त्वाच्या पक्षाकडून ही जागा कुणाला सुटते यावर तीनही क्षीरसागर यांचे तिकीट अवलंबून आहे.यात जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष म्हणून लढण्याची तयारी सुद्धा ठेवली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेकडून अनिल जगताप यांनी जय्यत तयारी केली आहे , त्यांना शिंदे गटाकडून उमेदवार म्हणून निश्चित समजले जात आहे .या सर्वांशी प्रत्यक्ष बोलल्यावर या चौघांनाही उमेदवारी आपल्यालाच मिळेल असे वाटते हे दिसून आले आहे .लोकसभेला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या प्रभावामुळे राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे निवडून आल्याचे दिसून आले आहे त्यामुळे मराठा समाजातील सीए बी.बी. जाधव ,माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले हेही राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत . या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अटीतटीची होईल पण अनिल जगताप सोडले तर कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवेल हे आज तरी सांगता येणार नाही त्यात पुन्हा मुस्लिम समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली आहे त्यामुळे मतदाना जवळ आल्यावरच नेमके कोणाचे पारडे जड हे स्पष्ट होईल असे सध्यातरी दिसत आहे.