मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमाराला मुंबईतील वांद्रे भागात ही घटना घडली. बाबा सिद्दीकी त्यांचा मुलगा झिशान याच्या कार्यालय परिसरात असताना, 3 जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यातली 1 गोळी बाबा सिद्दीकी यांच्या छातीत लागली होती. त्यांना तातडीनं लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. एका आरोपीला कोर्टाने 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर दुसऱ्या आरोपीचे वय तपासले जाणार आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज (दि.13) आरोपींना न्यायालयात हजर केले असता सरकारी आणि आरोपींच्या वकिलांमध्ये बराच वेळ युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी गुरुनैल सिंगला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसऱ्या आरोपी असलेल्या धर्मराज कश्यप वय तपासले जाणार आहे.
एका आरोपीचे वय 17 असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता. दरम्यान, कोर्टाने वकिलांचा युक्तिवाद गांभीर्याने घेत आरोपीची टेस्ट करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. ही टेस्ट होईपर्यंत आरोपी धर्मराज कश्यप पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. पोलीस ही टेस्ट करून आरोपीला पुन्हा कोर्टात हजर करा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला. या हल्ल्यात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन हल्लेखोर आरोपींना पकडलं आहे. धर्मराज राजेश कश्यप आमि गुरमैल बलजीत सिंह अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची क्राईम ब्रँच त्याच्या मागावर आहे. या आरोपींना काल अटक केल्यानंतर त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. हे दोन्ही शूटर बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. या आरोपींची आज मुंबईत जीटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी 19 वर्षीय आरोपी धर्मराज कश्यप याने आपण 17 वर्षांचा असल्याचा दावा केला. त्याच्या वकिलांनी देखील तसाच दावा केला. दुसरा आरोपी गुरमैल बलजीत सिंह याचं वय 23 वर्षे इतकं आहे.