ठासून दोन वर्षे पूर्ण केली.मुख्यमंत्र्यांचा घणाघात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आज मुंबईतील आझाद मैदानावर दसरा मेळावा झाला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. भाषणाच्या सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला.घासून नाही घासून पुसून नाही, ठासून दोन वर्ष पूर्ण केली –
महाराष्ट्र विरोधी आघाडीला घरी पाठवून आपलं सरकार आलं. तेव्हा काही लोक म्हणत होते हे सरकार 15 दिवस टिकणार नाही. एका महिन्यात पडेल, सहा महिन्यात पडेल. पण टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदे पुरुन उरला आणि जनतेच्या आशीर्वादाने साथीने घासून नाही घासून पुसून नाही, ठासून दोन वर्ष पूर्ण केली. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आनंद दिघेंचा चेला आहे. असा स्वस्तात जाणार नाही, असे शिंदे म्हणाले.
काही लोकांना हिंदू शब्दाची लाज वाटते –
आज काही लोकांना हिंदू शब्दाची लाज वाटत आहे. हिंदूहृदयसम्राट म्हणायला त्यांची जीभ कचरत आहेत. पण आपल्याला या शब्दाचा अभिमान आहे. बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमानी करणाऱ्यांपासून आपण शिवसेना मुक्त केली.
उठाव केला नसता तर शिवसैनिकांचा अपमान होत राहिला असता –
बाळसाहेबांनी सांगितले होते अन्याय सहन करू नका आणि जेव्हा अन्याय सहन होत नव्हता तेव्हा आम्ही उठाव केला. हा उठाव केला नसता तर शिवसेनेचे आणि शिवसैनिकांचा अपमान होत राहिला असता. आपले सरकार सत्तेवर आल्यावर महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 वर आणले, याचा अभिमान आहे.
इकडे लोक मरत होते आणि तुम्ही पैसे मोजत होतात –
मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा जाहीर करा म्हणत फिरत आहेत. दिल्लीच्या घरोघरी कोण फिरत आहे आपल्याला माहीत आहे. तुमच्या सहकाऱ्यांना तुमचा चेहरा चालत नाही, जनतेला कसे चालेल. फेसबुक लाईव्हच्या व्यतिरिक्त काय केले सांगा. कोरोनाच्या काळात केलेला घोटाळा, इकडे लोक मरत होते आणि तुम्ही पैसे मोजत होतात, कुठे फेडाल हे पाप?
माझ्यावर दाढीवरून टीका –
विरोधकांनी माझ्यावर माझ्या दाढीवरूनही टीका केली. पण याच दाढीवाल्याने महाविकास आघाडी उद्ध्वस्त केली. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका. मी घरात बसणारा मुख्यमंत्री नाही.
शिवसेना कोणाची आहे हे जनतेला माहीत आहे-
शिवसेना आपली आहे, बाळासाहेबांचे आपले आहेत, दिघे साहेबांचे विचार आपले आहेत. शिवसेना कोणाची आहे हे जनतेला माहीत आहे. तुम्ही तुमच्या झेंड्याचा रंग बदलला, तुमच्या चेहऱ्याचा रंग बदलला. आतंकवाद्याच्या कबरीचे उदात्तीकरण केले, काय वाटले असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला?
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन नाही आलो –
शेतकरी बळीराजा हे आपले अन्नदाता आहेत. यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम आम्ही करत आहोत. माता भगिनी यांच्यासाठी आम्ही काम करत आहोत. या तिजोरीवर पहिला हक्क कोणाचा आहे, शेतकऱ्यांचा आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. का तुम्हाला शेतकऱ्याचा मुलगा पचत नाही? मी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन नाही आलो. हे सगळे डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य आहे.
जिथे टेंडर, तिथे सरेंडर हे ठाकरेंचे धोरण –
जिथे टेंडर तिथे सरेंडर. कंत्राटदारांची लूट करताना जनाची नाही मनाची लाज वाटायला हवी होती. धारावी मुंबईचा विकास होईल हे सगळं मी पाहतोय. धारावी इथे देखील प्रकल्पात काड्या घालण्याचे काम सुरू आहे. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा, पण धाराविकरांना रस्त्यावर ठेवा. धारावीत आम्ही 2 लाख 10 जणांना घरे देणार, पात्र अपात्र बघणार नाही. 2 लाख कोटी रुपयांची घरे देणार. प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण आम्ही करणार.
बाळासाहेबांची स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केली –
तुम्ही शिवसेनेचा भगवा रंग बदलण्याचा प्रयत्न केला तुमचाच रंग बदलला. अश्या लोकांसमोर बाळासाहेब कधीही राहिले नसते. बाळासाहेबांची सगळी स्वप्न कोणी पूर्ण केली तर प्रधानमंत्री मोदी यांनी केली. हे म्हणत होते शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणारे मला सोडा दुसऱ्याला बनवायचे होते पण हे स्वतःच बसले, मोदींनी हे केले आणि मला मुख्यमंत्री बनवले.
मला हलक्यात घेऊ नका –
एकनाथ शिंदे म्हणाले, मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आनंद दिघे यांचा चेला आहे. मला हल्क्यात घेऊ नका. मी मैदान सोडत नाही. आज मी जिथे जातो, तिथे माझे स्वागत होते. मला आशीर्वाद मिळतात. मी हेच कमावले आहे. अवघ्या दोन वर्षांतच आपले सरकार लाडके सरकार झाले.