ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला.
यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.
या शोकप्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशीलता हादेखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो, मात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाजउभारणीच्या कामातही श्री. टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत श्री. टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे.
टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू होते. टाटा समुहाचे अध्यक्ष म्हणून आणि नंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून या समुहाचा कारभार अनेक वर्ष पाहिला. देशातल्या सर्वात जुन्या अशा टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून अतिशय परोपकारी वृत्तीने त्यांनी काम पाहिलं.
मोटारीपासून मिठापर्यंत आणि कंप्युटरपासून कॉफी-चहापर्यंत असंख्य उत्पादनांशी टाटा हे नाव अभिमानाने जोडले जाते. शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातही रतन टाटा यांनी आपले अनन्यसाधारण योगदान दिले. मुंबईवर झालेल्या २६ / ११ च्या हल्ल्यानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा स्मरणात राहणार आहे. कोविड काळात रतन टाटा यांनी पीएम रिलीफ फंडाला तत्काळ 1500 कोटी रुपये दिले. तसेच कोविड काळात रुग्णांसाठी त्यांची बहुतांश हॉटेलही उपलब्ध करून दिली. हा त्यांचा मोठेपणा कायम लक्षात राहणारा आहे.
नवनिर्मिती आणि दानशूरता यांचा अपूर्व संगम त्यांच्या ठायी होता. त्यांनी कधीही आपल्या ‘टाटा मूल्यां’ शी तडजोड केली नाही.
तरुणांमधील कर्तृत्वाला, प्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते.
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात तरुणांच्या कौशल्याला वाव आणि रोजगाराची संधी देण्यासाठी त्यांनी इनोव्हेशन सेंटर सुरू केलं.
महाराष्ट्र सरकारचा पहिला ‘उद्योग रत्न’ हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनाचा महाराष्ट्राला सदैव झाला. रतन टाटा यांच्या निधनाने आपला देश आणि महाराष्ट्राचेही कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे.
अशा भावना व्यक्त करीत राज्य मंत्रिमंडळाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.