• Contact Us
  • Home
Friday, February 6, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

यंदाचे लक्ष्मीपूजन कधी; शास्त्र काय सांगते?

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 18, 2025
in सांस्कृतिक
0
यंदाचे लक्ष्मीपूजन कधी; शास्त्र काय सांगते?



पुणे (दत्तात्रेय साधले) आपल्याकडे धार्मिक कर्म करताना बऱ्याचदा बरेच लोक दुसऱ्याने केवळ सांगितले लिहिले किंवा अमुक असं म्हणतो तमुक असं म्हणतो एवढ्याच विचारांनी प्रेरित होऊन कर्म करण्यासाठी प्रवृत्त होतात.तसे न करता सर्वात प्रथम हे निर्णय जाणून घेताना कोणीतरी व्यक्तीने किंवा कोणत्यातरी पंचांगात दिलेल्या दिवशी करण्याऐवजी ग्रंथात काय दिले आहे याविषयी चिंतन करूया.

ग्रंथांमध्येही दोन भेद आहेत आकर ग्रंथ आणि संदर्भ ग्रंथ.

आकर ग्रंथ म्हणजे मूळ ग्रंथ.
वेद उपनिषदे इ.

किंवा ज्याचा कर्ता हा कोणीतरी ऋषी किंवा आचार्य असतात.

उदा. मनुस्मृति, पाराशर स्मृति, याज्ञवल्क्यस्मृति इत्यादी स्मृति.

किंवा ब्रह्मपुराण भविष्यपुराण स्कंद पुराण इत्यादी पुराणे.

वरील सर्व ग्रंथातील वचने संदर्भ म्हणून एकत्रित करून अनेक ग्रंथ तयार झाले त्यांना संदर्भ ग्रंथ म्हणतात.
उदा. निर्णयसिंधू धर्मसिंधू इ.संदर्भ ग्रंथ सुद्धा अनेक आहेत.

या संदर्भ ग्रंथांना सुद्धा खूप महत्त्व आहे.
कारण एखाद्या विषयाचा निर्णय घेण्यासाठी आपल्याला १८ स्मृती किंवा १८ पुराणे, वेद उपनिषदे इत्यादी शोधावी लागतात ते प्रत्येक वेळी शोधणे अत्यंत कष्टाचे असते.
ते कष्टसाध्य काम  या संदर्भग्रंथामुळे अगदी सोपे होते.
कारण यात अनेक ग्रंथातील साधार वचने आणि मते देऊन त्यावर विचार करून, त्यांचा समन्वय साधूनच निर्णय दिलेला असतो. असो.

निर्णयसिंधू आणि धर्मसिंधू या दोन्हीही ग्रंथांची अनेक विद्वानांनी प्रशंसा केली आहे व त्यामुळेच ही दोन्ही नावे प्रसिद्ध व विद्वन्मान्य आहेत.

निर्णयसिंधुत निर्णय करताना पूर्वीच्या अनेक ग्रंथातील वचने देऊन निर्णय दिले आहेत. तर धर्मसिंधुत सुरुवातीलाच असे स्पष्ट केले आहे की आम्ही निर्णयसिंधू इत्यादी ग्रंथांना अनुसरूनच निर्णय देणार आहोत परंतु निर्णयसिंधुतील मूळ वचने देणार नाहीत. (कारण ग्रंथविस्तारभय)

याचाच स्पष्ट अर्थ असा आहे की निर्णयसिंधू हा धर्मसिंधुपेक्षा प्राचीन आहे.

आता लक्ष्मीपूजनाचा निर्णयसिंधूमधील निर्णय पाहू.

हेमाद्रौ भविष्ये
*#दिवा_तत्र_न_भोक्तव्यमृतेबालातुराज्जनात् |*
*#प्रदोषसमये_लक्ष्मीं_पूजयित्वा_ततः_क्रमात् ||*
*#दीपवृक्षाश्च_दातव्याः_शक्त्यादेवगृहेषुच |*
या अमावास्येचे ठायीं विशेष सांगतो हेमाद्रीत भविष्यांत “या आश्विन अमावास्येचे दिवशों बाल व रोगी यांवांचून इतरांनी दिवसा भोजन करू नये. प्रदोषकालीं लक्ष्मीचे पूजन करून नंतर क्रमानें देवालयामध्ये यथाशक्ति दीपवृक्ष लावावे.”

तत्रैवाभ्यंगमभिधाय
त्याच ठिकाणी अभ्यंग सांगून नंतर
*#एवं_प्रभातसमयेत्यमावास्यां_नराधिप |* *#कृत्वा_तु_पार्वणश्राद्धं_दधिक्षीरघृतादिभिः|*
*#दीपान्_दत्वा_प्रदोषे_तु_लक्ष्मीं_पूज्य_यथाविधि||*
*#स्वलंकृतेन_भोक्तव्यं_सितवस्त्रोपशोभिना ||*

अर्थ- “याप्रमाणें अमावास्येचे ठायीं प्रातःकालीं दही, दूध, तूप, इत्यादिकेंकरून पार्वण श्राद्ध करून प्रदोषकालीं दीप लावून यथाविधि लक्ष्मीपूजन करून श्वेतवस्त्राने शोभित व उत्तम अलंकारयुक्त होऊन भोजन करावें.”

*#अयंप्रदोषव्यापीग्राह्यः* (अयम् दर्शः)
ही अमावास्या प्रदोषव्यापिनी घ्यावी कारण…..

*#तुलासंस्थे_सह‌स्रांशौ _प्रदोषे_भूतदर्शयोः|*
*#उल्काहस्ता_नराः_कुर्युः_पितॄणां_मार्गद‌र्शनम्|*
इति ज्योतिषोक्तेः
“तुला राशीस सूर्य असतां चतुर्दशी व अमावास्या ह्या दोन दिवशी प्रदोषकालीं मनुष्यांनीं चूड हातांत घेऊन पितरांस मार्ग दाखवावा.” असे ज्योतिषग्रंथांत वचन आहे.

*दिनद्वयेसत्त्वेपरः*
*#दंडैक_रजनीयोगे_दर्शः स्यात्तु_परेहऽनि|* *#तदा_विहाय_पूर्वेद्युः_परेऽह्नि_सुखरात्रिके||*
इति तिथितत्त्वे_ज्योतिर्वचनात्
(हेही वचन पुरुषार्थ चिंतामणी मध्ये दिलेले आहे. जे सनत्कुमारसंहितेतील आहे.)

दोन दिवशों प्रदोषकाळीं असेल तर परा करावी. कारण, “जर दुसऱ्या दिवशी रात्री अमावास्या एक घटिका असेल तर पूर्व दिवस सोडून परदिवशी सुखरात्रि (लक्ष्मीपूजनादि) करावी” असे तिथितत्त्वांत ज्योतिर्वचन आहे.

(इथे सुद्धा एक लक्षात घ्यायचे आहे की दोन्ही दिवस प्रदोष काळात असेल तरच हा निर्णय आहे. )

दिवोदासीये तु
प्रदोषस्यकर्मकालत्वात्

दिवोदासीयांत तर-
प्रदोषकाल हा कर्मकाल असल्यामुळे आणि  *#अर्धरात्रे_भवत्येव_लक्ष्मीराश्रयितुं_गृहान्|*
*#अतः_स्वलंकृता_लिप्ता_दी पैर्जाग्रज्जनोत्सवाः||*
*#सुधाधवलिताः_कार्याः_पुष्पमालोपशोभिता ||*

इतिब्राह्मोक्तेश्च प्रदोषार्धरात्रव्यापिनीमुख्या

“लक्ष्मी ही मध्यरात्री घरांत येऊन राहते म्हणून घरें स्वच्छ सारवून चुना लावून शुद्ध करावी; व त्यांस रंग देऊन पुष्पें, माला यांनी सुशोभित करावी; दिवे लावावे. आणि मनुष्यांनी जागृत राहून उत्सव करावा”, ह्या ब्राह्मवचनावरून अर्धरात्री लक्ष्मी येत असल्यामुळे प्रदोष व अर्धरात्रव्यापिनी अमावास्याच मुख्य आहे.
म्हणजे वरील ज्योतिषवचनांनी प्रदोष कर्मकाल सांगितल्यामुळे प्रदोषव्यापिनी असावी, आणि ब्राह्मवचनाने मध्यरात्रव्यापिनी असावी, असे आहे म्हणून दोन्हीं काळव्यापिनी मुख्य होय.

एकैकव्याप्तौ परैव
*#प्रदोषस्य_मुख्यत्वात्_अर्धरात्रेऽनुष्ठेय_अभावाच्च*
एक एक कालीं व्याप्ति असतां पराच करावी. कारण, प्रदोषकाल मुख्य आहे. आणि मध्यरात्री कांहीं कर्तव्यही नाहीं.

-निर्णयसिंधू, द्वितीय परिच्छेद कार्तिक मास निर्णय. पान क्र २००

आता धर्मसिंधुतील निर्णय पाहू
निर्णयसिंधूला अनुसरून बाकी निर्णय समानच दिले आहेत.
याव्यतिरिक्त

*पुरुषार्थचिन्तामणौ तु*
*पूर्वत्रैव व्याप्तिरिति पक्षे परत्र यामत्रयाधिक व्यापि दर्शे दर्शापेक्षया प्रतिपद्वृद्धिसत्वे लक्ष्मीपूजादिकम् अपि परत्रैवेत्युक्तम्*

पुरुषार्थचिंतामणीमध्ये, पूर्व दिवशीच प्रदोषव्याप्ति असेल व दुसऱ्या दिवशीं तीन प्रहराहून अधिक अमावास्येची व्याप्ति असेल तर अमावास्येपेक्षा प्रतिपदा अधिक असल्यास लक्ष्मीपूजनादिक दुसऱ्या दिवशींच करावें, असे सांगितले आहे.

असे पुरुषार्थ चिंतामणीकारांचे केवळ मत देऊन पुढे लगेचच आपले मत सांगतात. ते असे…..

*एतन्मते उभयत्र प्रदोष अव्याप्तिपक्षेपि परत्र दर्शस्य सार्धयामत्रय अधिकव्यापित्वात् परैव युक्तेति भाति |*

या मतानें, दोन्ही दिवस प्रदोषकाली व्याप्ति नसली तरी दुसऱ्या दिवशी साडतीन प्रहरांहून अधिक अमावास्येची व्याप्ति असते ह्मणून दुसऱ्या दिवसाचीच घ्यावी हे युक्त आहे असें वाटते.

याचाच अर्थ धर्मसिंधुकार पुरुषार्थ चिंतामणीच्या या मताशी सहमत नाहीत. कारण हे मत पूर्वीच्या सर्व मतांचे विरोध दर्शवते.
तसेच धर्मसिंधुकारांच्या पूर्ण मताचा विचार न करता केवळ अर्ध्याच विषयाचा विचार करून काहीजणांनी 21 तारखेला लक्ष्मीपूजनाचा निर्णय घेतला आहे तो अयोग्य ठरतो.

धर्मसिंधूमध्ये जो पुरुषार्थ चिंतामणी ग्रंथाचा उल्लेख आढळतो तो निर्णय सिंधू मध्ये आढळत नाही.
याची दोन कारणे असू शकतात एक म्हणजे पुरुषार्थ चिंतामणीतील लक्ष्मीपूजनाचा निर्णय सिंधूकारांना (सर्व पुरातन वचनांचा विरोध असल्याने) अग्राह्य वाटणे किंवा निर्णयसिंधूच्या निर्मितीनंतर आणि धर्मसिंधुच्या पूर्वी या ग्रंथाची निर्मिती झालेली असणे.
मला यातील दुसरी शक्यता जास्त वाटते. असो.

असे जरी असले तरी पुरुषार्थ चिंतामणी ग्रंथामध्ये जे पाहायला मिळते ते पुढे देतो…

प्रातरभ्यङ्गे ज्योतिःशास्त्रप्रसिद्धतिथिलाभः स्पष्टः ।
प्रदोषे ज्योतिःशास्त्रप्रसिद्धतिथी अभावेऽपि साकल्यवचनप्रतिपादितातिथिसत्त्वमादाय *दीपदानलक्ष्मीपूजादिकम् अमावास्योपलक्षितप्रदोष एव कार्यम् ।*
लक्ष्मीपूजन दीपदान इत्यादी अमावस्या व्याप्ती असलेल्या प्रदोषातच करावे.

द्वितीयदिने दीपदानबलिपूजादिकं प्रतिपदुपलक्षित-प्रदोषे कर्तव्यम् इति सिद्धः

आणि दुसऱ्या दिवशी दीपदान आणि बलि पूजा इत्यादी गोष्टी प्रतिपदा व्याप्त प्रदोषातच कराव्यात.

*सर्ववाक्यैकवाक्यतयैव* (सर्व वाक्यांची एक वाक्यता येण्यासाठी) दीपोत्सवचतुर्दश्या-दितिथित्रयनिर्णयः ।
-पुरुषार्थ चिंतामणी पान क्रमांक ३०८

हा पुरुषार्थ चिन्तामणी ग्रंथ विष्णूभट्ट विरचित आहे.
या विष्णुभट्टांचाही पूर्व वचनांना विरोध नाही व सर्व वचनांची एकवाक्यता येण्याविषयी आग्रह दिसतो.

यात एक शंका येऊ शकते की धर्मसिंधुकारांना जर मत मान्यच नव्हते तर दिले का?
त्याचे असे असते की एखाद्या मताचे खंडन करायचे असल्यास ते मत देऊन मगच खंडन शक्य असते. (उदा. चार्वाकाचे मत खंडन करताना आधी *ऋणं कृत्वा घृतम् पिबेत्* हे त्याचे मत देऊन मगच हे कसे अयोग्य आहे हे सांगावे लागते तद्वतच….)

आता आपण तिथी आणि प्रदोष काळाविषयी विचार करू.
तिथी आणि प्रदोषासाठी आपल्याला ज्योतिषाचा अभ्यास करावा लागेल.
यासाठी दोन गणितांचा वापर होतो एक सूर्यसिद्धांत आणि दुसरे दृक सिद्धांत.
दोन्हीही गणितावर आधारित पंचांगे महाराष्ट्रात उपलब्ध आहेत.
यात सूर्य सिद्धांताप्रमाणे अमावास्या वीस तारखेला 16.28 मिनिटांनी सुरू होऊन 21 तारखेला 17.52 ला संपते आहे.

आणि दृक सिद्धांतिय गणितानुसार 20 तारखेला 15.44 सुरू होऊन 21 तारखेला 17 वाजून 55 मिनिटांनी समाप्त होते आहे.

प्रदोष काळ सूर्यास्तानंतर साधारणपणे दोन ते अडीच तासाचा असतो.

सूर्यसिद्धांत गणितानुसार (पुणे) 20तारखेला  06 वाजून 04 व मिनिटांनी 21 तारखेला 06 वाजून 03 मि. सूर्यास्त होत आहे.

तसेच दृक सिद्धांतिय गणितानुसार (पुणे) 20 तारखेला 06.08 आणि 21 तारखेला 06.09 मि. सूर्यास्त आहे.

याचाच अर्थ दोन्हीही गणितानुसार संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच ३६ जिल्ह्यांमध्ये आदल्या दिवशीच प्रदोषव्यापिनी आणि मध्यरात्रव्यापिनी अशी अमावस्या मिळते आहे.
तसेच दुसऱ्या दिवशी प्रदोषकाळात एक मिनिट सुद्धा अमावस्या मिळत नाही.

मग हा 21 तारखेचा अट्टाहास कशासाठी?

याशिवाय काही जणांचे असे म्हणणे आहे की २० तारखेला ज्यांनी लक्ष्मीपूजन करावे असे म्हटले आहे त्यांनी वचनांचा योग्य अर्थ लावला नाही.
त्यांना हात जोडून विनंती आहे की आपण स्वतःच वचनांचा योग्य तो अर्थ लावावा आणि निर्णय द्यावा. दुसऱ्या कोणालाही दोष देत बसू नये.

जिज्ञासूंसाठी खाली पुरुषार्थ चिंतामणी निर्णय सिंधू आणि धर्म सिंधूची पाने देत आहे.

टीप- यावर्षी ऑक्टोबर २० तारखेला लक्ष्मीपूजन करण्याविषयीचा संदेश अनेक जणांना पाठवल्यानंतर काहीजणांनी १)आम्ही मंगळवारीच लक्ष्मीपूजन करणार,
२)आम्ही अनेक वर्षे अमुक पंचांग वापरतो आणि पुढेही वापरत राहणार,
३)महाराष्ट्रातील बाकी सर्व जण एकमताने निर्णय देत असताना एकाचाच निर्णय वेगळा येत आहे,
४)लक्ष्मीपूजन कधीही केले तरी कोणाच्याही कुंडलीत काहीही फरक पडत नाही,
५) आपण जे पंचांग वापरतो त्यातलाच निर्णय योग्य.
इत्यादी संदेश मला पाठवले जे खोडसाळपणाचे तसेच पूर्णपणे अविद्यामूलक आहेत.
त्यांची उत्तरे पाहू….

१) अज्ञान, धर्माविषयी अनासक्ती, व्यर्थ अट्टाहास.
२)याचाच अर्थ योग्य काळी योग्य गोष्ट घडली नाही तरी चालेल परंतु आम्ही आंधळेपणाने अनुसरण करणार असाच त्यातून अर्थबोध होतो. प्रयत्नाने अयोग्य करण्याचा अट्टाहास करू नये.
३) येथे संख्याबळाचा विचार करू नये योग्य करणारा एकटाच जरी असेल तरी त्याचेच अनुकरण केले पाहिजे.
४) मग तर 21 तारखेला लक्ष्मीपूजन करण्याचा सुद्धा अट्टहास सोडावा लागेल.🙏🏻😊👍🏻
५) आपण जे पंचांग वापरतो त्यात दिल्याप्रमाणेच लक्ष्मीपूजन करावे असे म्हणणे म्हणजे अयोग्य असेल तरी त्या अयोग्याचाच पाठपुरावा करण्यासारखे आहे.

अशाच अज्ञानीजनांच्या मार्गदर्शनाने अनेक जण योग्य काळी लक्ष्मीपूजनापासून वंचित राहू नयेत यासाठीच हा लेखनाचा प्रपंच करावा लागला. (तसे बघितले तर 360 ही दिवस प्रदोषकाळी लक्ष्मीपूजन केले तरी चालणारच आहे परंतु आपण व्रत म्हणून वर्षातून एकदाच करत असल्याने ते आग्रहाने योग्य काळी व्हायला पाहिजे. कारण अयोग्यकारी केलेल्या करकव्रताने प्राप्त झालेले दुष्परिणाम आपल्याला ज्ञात आहेतच.)
विशेष टीप- आपल्या कल्याणासाठी उपदेश करणाऱ्याचे न ऐकल्याने उपदेश करणाऱ्याचे काहीही बिघडत नसते उलट हितोपदेश न ऐकणाऱ्याचेच अकल्याण होते. 🙏🏻😊

तरीही वरील सर्व विषयांचा श्रद्धापूर्वक अभ्यास करून  २० ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करण्याचा निर्णय घेऊन लक्ष्मीची कृपाप्राप्ती करून (आत्मैव ह्यात्मनः बन्धुः या उक्तीप्रमाणे) आपणच आपले कल्याण साधावे ही विनंती. 😊🙏🏻

विश्वावसूसंवत्सर
आश्विन कृष्ण एकादशी
दिनांक 17 ऑक्टोबर 2025.

दत्तात्रेय साधले पुणे
90 11 55 81 86

Previous Post

धनत्रयोदशी….

Next Post

निवडणुका डिसेंबरमध्ये..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
निवडणुका डिसेंबरमध्ये..

निवडणुका डिसेंबरमध्ये..

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.