

मुंबई (प्रतिनिधी ) मराठवाड्यातील आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागांतील हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली, शेकडो जनावरे मृत्यूमुखी पडली आणि अनेक घरं जमीनदोस्त झाली.
नैसर्गिक आपत्तीने घायाळ झालेल्या मराठवाड्यासाठी अशा कठीण परिस्थितीत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या निर्णयामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सणासुदीच्या काळात हसू परत येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की “राज्यभरात 68,79,756 हेक्टर जमीन अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झाली आहे. एकूण 29 जिल्हे आणि 253 तालुके या आपत्तीच्या विळख्यात सापडले आहेत. अनेक शेतजमिनींवर गाळ साचला असून काही ठिकाणी जमीनच वाहून गेली आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे”. तसेच शेतकऱ्यांना पुन्हा रब्बी हंगाम सुरू करता यावा यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देण्याची तयारीही सरकारने दाखवली आहे.







