

मुंबई – ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने भारताच्या वनडे संघाची आणि टी-२० संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली सात महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसणार आहेत.पण यादरम्यान बीसीसीआयने मोठा निर्णय घेत याची घोषणा केली आहे. बीसीसीआयने एकदिवसीय फॉरमॅटसाठी कर्णधार म्हणून रोहित शर्मा ऐवजी शुबमन गिलला संधी दिली आहे.२०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणाऱ्या टीम इंडियाचे नेतृत्त्व करणारा रोहित शर्मा आता संघाचा कर्णधार नसेल. त्याच्या जागी कसोटी संघाचा कर्णधार आणि स्टार सलामीवीर शुबमन गिलला एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

रोहित शर्मा संघात असतानाही गिलला वनडे संघाचं कर्णधारपद
१९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीची बैठक शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी झाली. या बैठकीत, खेळाडूंच्या निवडीव्यतिरिक्त, भविष्याचा विचार करत कर्णधारपदाबाबतही निर्णय घेण्यात आला आणि अखेर, अनेक आठवड्यांच्या अनुमानानंतर, हा गिलला कर्णधार करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंग्लंड दौऱ्यातील गिलचे नेतृत्त्व, फलंदाजीतील त्याची कामगिरी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघातील त्याचे भक्कम स्थान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान शुबमन गिलला टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते, त्यामुळे तो रोहित शर्माच्या जागी कर्णधारपदाची जबाबदारी घेऊ शकतो अशी चर्चा होती. पण आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेसाठी संघ जाहीर होताच यावर शिक्कामोर्तब झाला आहे. तर वनडे संघाचं उपकर्णधारपद श्रेयस अय्यरकडे असेल. रोहित शर्मा, विराट कोहलीचाही संघात समावेश आहे. तर केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर यांनी संधी मिळाली आहे.गोलंदाजीत जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली असून त्याची निवड करण्यात आलेली नाही. मोहम्मद सिराज. अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा असतील. फिरकी गोलंदाज म्हणून अक्षर पटेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल संघाचा भाग असतील. तर रवींद्र जडेजाची देखील वनडे संघात निवड करण्यात आलेली नाही.
वनडे मालिकेबरोबरच टी-२० संघाची घोषणाही करण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहला टी-२० संघात संधी देण्यात आली आहे. आशिया चषकासाठी जो भारतीय संघ होता, अगदी त्याप्रमाणेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघनिवड करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नीतीश कुमार रेड्डी, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल.
संघाबाबत, काही काळापासून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रेयस अय्यरला या मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय, आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी दुखापत झालेला अष्टपैलू हार्दिक पंड्या पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हता. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही, ज्यामध्ये मोहम्मद सिराज गोलंदाजी विभागात मुख्य जबाबदारी बजावताना दिसतील. याशिवाय अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांचीही निवड करण्यात आली आहे, तर हर्षित राणा देखील एकदिवसीय मालिकेच्या संघाचा भाग आहे. कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांची एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. भारतीय संघ या दौऱ्यातील पहिला एकदिवसीय सामना १९ ऑक्टोबर रोजी खेळणार आहे, तर दुसरा आणि तिसरा सामना २३ आणि २५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.






