
बीड( प्रतिनिधी ) बीड शहराचे वैभव असणारे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या भाड्यापोटी १५ वर्षात मिळालेल्या लक्षावधी रूपयांपैकी पालिकेने नाट्यगृहाच्या दुरूस्तीसाठी किती निधी खर्च केला , नाट्यगृहासाठी खरेदी करण्यात आलेल्या साहित्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असुन नाटयगृहाचे ऑडिट करण्यात यावे. नाट्यगृहाची दुरावस्था असुन फुटलेल्या काचा, तुटक्या खुर्च्या,मोडलेले स्टेज,फाटलेले पडदे,बंद वातानुकूलित यंत्रणा, अचानक बंद पडणारी ध्वनीक्षेपक यंत्रणा, तुटलेले सोफे,घाणेरडे स्वच्छतागृहे याबरोबरच नाट्यगृहाच्या आवारात झाडाभोवती झालेली पडझड, तुंबलेल्या नाल्या व पसरलेले घाणीचे साम्राज्य आणि सुविधांचा अभाव याकडे मुख्याधिकारी नगरपरीषद बीड यांचे दूर्लक्ष आणि स्थानिक कलाकारांना नाट्यगृहाचे अवाजवी भाडे ,नगरपरिषद प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे नाट्यगृहातील असुविधांमुळे बाहेर जिल्ह्यातील कलाकारांकडून जाहिर नाराजी व्यक्त करण्यात येत असुन त्यामुळे बीड जिल्ह्याची बदनामी होत आहे यांच्या निषेधार्थ व नाट्यगृहाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२४ सोमवार रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आवारात लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड, मुख्याधिकारी नगरपरीषद बीड यांच्या मार्फत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार,पालकमंत्री बीड अजितदादा पवार, नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड,सुदाम तांदळे, बीड जिल्हाध्यक्ष इंटक रामधन जमाले, शिवशर्मा शेलार, पांडुरंग हराळे तसेच ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ .सतिश साळुंखे, प्रा.प्रतिक कांबळे,प्रा.प्रविण निसर्गंध,प्रा.अक्षय कोकाटे,प्रा.दिपक कोरडे आदिंनी आंदोलन स्थळी भेट देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

नाट्यगृहाचे ऑडिट करण्यात यावे.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची गेल्या कित्येक वर्षांपासून दुरावस्था झाली असुन फुटलेल्या काचा, तुटक्या खुर्च्या, मोडलेले स्टेज,फाटलेले पडदे,बंद पडलेल्या लाईट्स,कायम बंद असणारी वातानुकूलित यंत्रणा, अचानक बंद पडणारी ध्वनीक्षेपक यंत्रणा, तुटलेले सोफे, घाणेरडे स्वच्छतागृहे याबरोबरच नाट्यगृहाच्या आवारात झाडाभोवती झालेली पडझड, तुंबलेल्या गटारी तथा घाणीचे पसरलेले साम्राज्य अशा अनेक सुविधांचा अभाव आहे.मात्र नाट्यगृहातील ध्वनीक्षेपक यंत्रणेसाठी झालेला खर्चामध्ये अपहार झाला असून नाट्यगृहाच्या भाड्यापोटी १५ वर्षात मिळालेल्या लक्षावधी रूपयांपैकी पालिकेने नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी किती खर्च केला याबद्दल शंका असुन याचे ऑडिट करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
मुंल ज्येष्ठ कलावंतांकडून तीव्र नाराजी
चार वर्षांपूर्वी २०२१ मध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मराठी चित्रपट अभिनेते भरत जाधव यांनी ” सही रे सही “या नाटकाचा प्रयोग सुरू असताना नाट्यगृहातील दुर्दशेमुळे चालू नाटकाचा प्रयोग बंद करत जाहीर नाराजी व्यक्त केली होती .तर डिसेंबर २०२३ मध्ये बीड येथे अभिनेते शरद पोंक्षे यांचे “मी नथुराम गोडसे बोलतोय” हे नाटक होणार होते. परंतु नाट्यगृहातील ८० खुर्च्या तुटलेल्या अवस्थेत
असल्याने संयोजकांनी नाटकाचा प्रयोग घेतला नाही. त्यानंतर यावर्षी १६ फेब्रुवारी रोजी” पुरुष” नाट्य प्रयोग दरम्यान जेष्ठ कलावंत शरद पोंक्षे यांनी नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्र बंद असणे,नाट्यगृहाचे अवाजवी भाडे , तुटलेल्या खुर्च्या ,मेकअप रूम मधील विद्युतीकरणाचा अभाव,स्वच्छतागृहांची अस्वच्छता याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करत यापुढे या नाट्यगृहात प्रयोग करणार नाही. असे जाहीर केले . नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे बीड जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत असून संबंधित प्रकरणात जबाबदार प्रशासकीय अधिकारी कारवाई करण्यात यावी.
राजकारण्यांना मोफत,
कलावंतासाठी अवाजवी भाडे.
राजकीय कार्यक्रमांसाठी मोफत तर कलावंतांना आवाजवी भाडे; स्थानिक कलावंतांना सवलत द्यावी .बीड नगरपालिका नाट्यगृहासाठी आवाजवी भाडे आकारणी करत असून विशेष म्हणजे राजकीय कार्यक्रमासाठी ही वास्तू मोफत दिली जात असून स्थानिक कलाकारांकडून आवाजवी भाडे आकारणी करण्यात येत असून सांस्कृतिक कार्यक्रम कमी आणि राजकीय कार्यक्रम जास्त होत असल्याचा आरोप स्थानिक कलावंतां कडून केला जात आहे .स्थानिक कलावंतांना सवलतीच्या दरात नाट्यगृहाचा लाभ करून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधीना अनास्था.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाट्यगृहाबद्दल अनास्था दिसून येते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी, आयुक्त ,जिल्हाधिकारी विविध कार्यक्रमासाठी येतात .सर्वजण भाषणे ठोकून मोकळे होतात. परंतु नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल चकार शब्द काढत नाहीत एकंदरीत नाट्यगृहाबद्दल त्यांना अनास्था दिसून येते त्यामुळे त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
बँकेने केले होते सील.
जून २०२३ मध्ये द्वारकादास मंत्री बँकेने नाट्यकाला सील ठोकून लिलाव काढण्याचा घोषणा केल्यानंतर १ कोटी ४ लाख रुपयांचा भरणा केला होता .जून २०२३ मध्ये बीड येथील नगर परिषदेच्या नाट्यगृह बांधकामासाठी बीडच्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेने १ कोटी रुपयांचे कर्ज सन २००६ मध्ये दिले होते. प्रारंभी काही वर्ष नगर परिषदेने व्याज व हप्त्याची रक्कम भरणा केली. परंतु पुढे कर्जाची मुदत संपूनही कर्ज भरणा केला नाही .त्यामुळे द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची इमारत सील केली होती. बँक नाट्यगृहाचा कधीही लीलाल करेल या भीतीपोटी नगरपालिका प्रशासनाने बँकेचे सर्व कर्ज परत करण्यासाठी कॅनरा बँकेचा १ कोटी ४ लक्ष ३३ हजार ३९६ रुपये रकमेचा धनादेश जमा केला होता. बीड नगरपालिकेचा इतिहास अशी कारवाई कधी झाली नव्हती यामुळे मोठ्या प्रमाणावर बीड शहरात बदनामी झाली.