
बीड (प्रतिनिधी) – शहरातील मुलभूत नागरी प्रश्नांच्या संदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.२०) रोजी नगर पालिकेची आढावा बैठक घेतली. स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, नाल्या, वीज आदि मुद्यावरून आ.संदीप क्षीरसागर यांनी अधिकार्यांना सुनावले. प्रत्येकवेळी कोणतेही काम सांगितले तर निधी नाही असे कारण सांगणार्या अधिकार्यांनी नगर पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी काय प्रयत्न केले ? असा सवालही आ.संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला. पाणी पुरवठ्यात हयगय खपवून घेणार नाही. स्वच्छतेच्या कामांना प्राधान्य द्या आणि उत्पन्न वाढीच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करा असे निर्देश यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी दिले.
बीड नगर पालिकेतील मुख्याधिकार्यांच्या दालनात झालेल्या बैठकीस आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, मुख्याधिकारी निता अंधारे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी नागरीकांनी देखील आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे शहरातील समस्या मांडल्या. आ.संदीप क्षीरसागर आणि माजी आ.सय्यद सलीम यांनी नगर पालिकेच्या उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सुचना देखील यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी दिल्या. नगरपालिकेतील पाणी पुरवठा व जलनिस्सारण विभाग, बांधकाम विभाग, अग्निशमन विभाग, अभिलेख विभाग, कर विभाग, लेखा परीक्षण विभाग, विद्युत विभाग, संगणक विभाग आदींसह नगररचना विभागाचा आढावाही आ.क्षीरसागर यांनी घेतला. यासोबतच गेल्या काही वर्षांपासून शहरातील मालमत्तांचा रिव्हीजन सर्व्हे झालेला नाही. हा सर्व्हे दर चार वर्षांनी केल्यास उत्पन्न वाढवता येईल. बीओटी तत्वावरील काही इमारती धुळखात पडलेल्या आहेत. त्या वापरात आणून त्यातूनही उत्पन्न वाढविता येऊ शकते. अशा उपाययोजना यावेळी सुचविण्यात आल्या. बीड शहरात एकाही ठिकाणी नगर पालिकेची पार्किंग नाही,त्यामुळे काही जागा ज्या पडीक आहेत, किंवा वापरात नाहीत अशा ठिकाणी व्यवसायीक गाळे आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध केल्यास त्यातूनही उत्पन्न वाढवता येईल अशा देखील सुचना यावेळी करण्यात आल्या. नाविण्यपुर्ण योजनेतून नगर पालिकेला निधी मिळावा त्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी दिल्या. शहरात ठिकठिकाणी लोखंडी कचरा कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र त्या जाग्यावरच सडून चालल्या आहेत. त्याच्या खरेदीच्या अनुषंगानेही कार्यवाही करावी, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, नाल्या, वीज हे मुलभूत प्रश्न तात्काळ मार्गी लावा त्यात हयगय करू नका लोकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवा अशा सक्त सुचना आ.संदीपभैय्या क्षीरसागर यांनी अधिकार्यांना दिल्या.

बीड शहरातील जुन्या भाजी मंडईत नगर पालिकेने मच्छीमार्केटसाठी इमारत बांधलेली आहे. रेडिरेकनर प्रमाणे त्याचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. भाडे जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी कोणताच व्यवसायीक पुढे येत नाही त्यामुळे नाममात्र दरात तेथील गाळे व्यवसायीकांना दिल्यास नगर पालिकेचे उत्पन्न वाढू शकते अशी सुचना यावेळी अधिकार्यांना करण्यात आली. त्याचबरोबर जुन्या भाजी मंडईत बीओटी तत्वावरील आणखी कॉम्पलेक्स बांधता येतील का ? या दृष्टीनेही नगर पालिकेने प्रयत्न करावेत. जेणेकरून पालिकेच्या उत्पन्नात भरत पडेल अशीही चर्चा या बैठकीत करण्यात आली.