
बीड( प्रतिनिधी) संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. काल अटक केलेल्या सर्व सात आरोपींना मोक्का लावल्यानंतर आज पोलिस दलाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. बिडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल १०० जणांना शस्त्र परवाना रद्द करण्याची नोटीस पाठविली आहे.
या प्रकरणात महत्त्वाचा संशयीत असलेल्या वाल्मिक कराडचा शस्त्र परवानाही रद्द करण्यात आला आहे.एकाच घरात एका पेक्षा अधिक शस्त्र परवाने देखील देण्यात आलेले असून आता परवाने रद्द करीत असतानाच हे शस्त्र परवाने खिरापतीसारखे वाटणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काही कारवाई होणार काय ?असाही प्रश्न विचारला जात आहे.सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. रोज या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी कोठे ना कोठे आंदोलने मोर्चे सुरु आहेत. त्यातच हत्येची चौकशी सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे आदेश दिले होते. बंदुकीसोबत ज्या कुणाचे फोटो आहेत किंवा सोशल मीडियावर व्हिडीओ आहे, त्या सर्वांचे बंदुक परवाने रद्द करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले होते. शिवाय या प्रकरणातील आरोपींना मोक्का लावण्यात येणार असल्याचे सांगितले होते. शनिवार या आरोपींना मोक्का लावला, तर आजपासून शस्त्र परवाने रद्द करण्याची कारवाई सुरु झाली.
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर आता बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही अँक्शन घेतली आहे. बीड जिल्ह्यातील सुमारे १०० परवानाधारकांना नोटीस पाठविण्यात आली आहे. दोन आठवड्यात या सर्व परवानाधारकांना नोटीस पाठविली गेली आहे. आता या सर्वांचे बंदुक परवाने रद्द होणार आहेत. या सर्वांना आपापली शस्त्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परवाने निलंबीत झाल्यानंतरही जर सोशल मीडियावर किंवा इतर सार्वजनीक ठिकाणी शस्त्र सापडले तर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या कारवाईत वाल्मिक कराड यांचाही शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. वाल्मिक हा सध्या सीआयडी कोठडीत असल्याने त्याच्यापर्यंत अद्याप ही नोटीस पोहोचली नाही. मात्र कोठडीतून बाहेर आल्यानंतर वाल्मिकला नोटीस दिली जाणार आहे. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. बाकी अटक झालेल्या सर्वांना मोक्का लावण्यात आला आहे. आता अटकेतील सर्व आरोपींचा खटला विशेष न्यायालयात चालणार आहे.