
नागपुरात (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकी आधी महायुती सरकारने लाडकी बहिण योजना जाहीर केली. ही योजना भलतीच यशस्वी ठरली. राज्यात मोठा प्रतिसाद या योजनेला मिळाला. जसा या योजनेला प्रतिसाद मिळाला तसा लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पदरातही भरभरून मतं टाकली.महायुतीने रेकॉर्डब्रेक विजय संपादीत केला. निवडणूका झाल्या. नवं सरकार सत्तेवर आलं. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी जमा होणार असा प्रश्न विरोधक विचारत होते. शिवाय लडक्या बहिणींचे आपला हफ्ता कधी जमा होणार याकडे लक्ष लागले होते. त्याचे उत्तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले आहे. शिवाय हे पैसे कोणाच्या खात्यात जमा होणार आहेत हेही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
जनतेने आम्हाला जनादेश दिला आहे, तो तुम्ही स्विकारा असं देवेंद्र फडणवीसांनी सुरूवातीलाच सांगितले. गेल्या तीस वर्षात ऐवढा मोठा विजय कोणालाच मिळाला नाही असंही ते म्हणाले. या विजयामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. निवडणुकीत आम्ही जी आश्वासने दिली आहेत. ती आम्ही पूर्ण करणार आहोत. त्यापासून आम्ही मागे हटणार नाही असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. शिवाय ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या कधीही बंद करणार नाही असं आश्वासन ही त्यांनी यावेळी दिलं.
विशेष म्हणजे लाडकी बहिण योजनेबाबत फडणवीस काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार फडणवीस यांनी लाडकी बहिण योजनेचा उल्लेख केला. लाडक्या बहिण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता आम्ही हिवाळी अधिवेशन संपल्यावर त्यांच्या खात्यात टाकणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले आहे. नागपूर इथे होत असलेलं अधिवेशन 21 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे 21 डिसेंबरनंतर हा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
दरम्यान काही महिलांना वगळलं जाणार अशी चर्चा होती. मात्र सरसकट सर्व महिलांच्या खात्यात हे पैसे टाकले जाणार असल्याचं फडणवीस म्हणाले. त्यासाठी कोणतेही नवे निकष लावले जाणार नाहीत असंही ते म्हणाले. त्यामुळे सर्वांनाच हे पैसे मिळणार आहेत. पण काहींनी चार चार खाती उघडली आहे. जर कोणी एखाद्या सरकारी योजनेचा गैर फायदा घेत असेल तर त्यावर कारवाई ही होणारच असं फडणवीस म्हणाले. एका माणसानेही चार चार खाती उघडली होती. त्याला आता लाडका भाऊ तरी बोलू शकतो का? अशा लोकांवर कारवाई केली जाईल असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. शिवाय दिलेली आश्वासने पाळणार असल्याचंही सांगितलं.