
अंबड(प्रतिनिधी) स्व.श्री त्रिंबकराव जळगांवकर यांनी सुरू केलेला आणि गायनाचार्य पंडित गोविंदराव जळगांवकर यांनी स्वरसातत्याने जोपासलेला शतकपूर्ती दत्त जयंती संगीत महोत्सव अंबड नगरपरिषदेच्या गायनाचार्य पंडित गोविंदराव जळगांवकर नाट्यगृह येथे सुरू झाला. पारंपरिक सामगायनाने मोहोत्सवाची अध्यात्मिक वातावरणात सुरुवात करण्यात आली तर श्रीराम संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘हे प्रभो विभो’ या नांदीने सांगीतिक प्रारंभ करण्यात आला.पं. उल्हास कशाळकर यांचे गायन,पं. रोणू मुजुमदार यांचे बासरीवादन, पार्वती दत्ता यांचे कथ्थक नृत्य ,यशवंत वैष्णव यांचे एकल तबला वादन आणि शिवम तोडकर यांच्या शहनाई वादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

संगीतोत्सवाच्या पहिल्या आणि शुभारंभपर सत्राची सुरुवात संभाजीनगर येथील शिवम तोडकर या युवा शहनाईवादकाने आपल्या सुरेल आणि तयारीच्या वादनाने केली,त्याने राग नंद सादर केला ,या रागातील आर्तता आणि सौंदर्य खुलवित मैफिलीवर गारुड केले,तर ‘याद पिया की आये’ ही सुप्रसिद्ध ठुमरी वाजवून त्याने आपल्या रंगतदार वादनाची सांगता केली. त्याला जगमित्र लिंगाडे या तरुण तबलावादकाने तोलामोलाची साथ करीत हे वादन अधिक श्रवणीय केले.

या आधी जेष्ठ कलालवंत पं. उल्हास कशाळकर, अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण,दीपकसिंह ठाकूर,विठ्ठलसिंग राजपूत,विजय कोठोडे ,संयोजक अरविंद जळगांवकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून शुभारंभ करण्यात आला.


पार्वती दत्ता यांचे कथ्थक नृत्य..
छत्रपती संभाजीनगर येथील सुविख्यात कथ्थक नृत्यांगना सुश्री पार्वती दत्ता यांनी कथ्थक नृत्य सादर केले.काव्यपुर्ण रचनेत सूर्याला वंदन करणारी वंदना सादर करून नृत्यास प्रारंभ केला.धृपद शैलीतील पं., मधूप मुदगल यांच्या रचनेवर हे नृत्य आधारित होते.जय जय राम कृष्ण हरी या रचनेवर झपतालात थाट सादर केला.यानंतर शीतल आणि सिद्धी यांनीही झपतालातील लक्षणगीतावर नृत्य सादर केले.त्यांना सुरंजन खंडाळकर (गायन)आणि निरंजन भालेराव (बासरी) आणि तबल्यावर चारुदत्त फडके यांनी त्यांना साथ केली.
पं. उल्हास कशाळकर.
ग्वाल्हेर,आग्रा आणि जयपूर घराण्याच्या गायकीचे प्रतिनिधित्व करणारे जेष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांनी राग भूपाली विलंबित आणि मध्य लय तीनतालात सादर केला.विलंबित रचनेचे बोल होते ‘जब मै जाने तीहरी बात सूरजनवा’ तर मध्य लयीतील बोल होते ‘जब तुम्ही संग लागी’ आणि एक तराना सादर केला.त्यांनी राग बहार मध्ये दोन बंदिशी सादर केल्या.यात ‘कलीयन संग करता रंग रलिया ‘ आणि ‘बन बन बेलरी फुलीया बनया’, या रचनांचा समावेश होता.आपल्या अभ्यासपूर्ण मंडणीने त्यांनी उच्च प्रतीचे गाणे ऐकवून श्रोत्यांना तृप्त केले.त्यांना इशांत परांजपे (तबला) सौमित्र क्षीरसागर (हार्मोनियम)यांनी संयत साथ केली.
पं.रोणू मुजुमदार..
बनारस येथील प्रख्यात बासरीवादक पं. रोणू मुजुमदार यांनी राग रागेश्री सादर केला, मध्य लय रूपक तालात तर द्रुत लय तीन तालात त्यांनी हा राग विस्ताराने सादर करीत आपल्या बासरी वादनाची जादू निर्माण केली,एक पहाडी रागातील धून सादर करून त्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण वादनाची सांगता केली. त्यांना तबल्यावर पं. अरविंदकुमार आझाद यांनी बहारदार साथ केली.
यशवंत वैष्णव.
प्रख्यात युवा तबलावादक यशवंत वैष्णव यांच्या एकल (सोलो)तबला वादनाने श्रोते मंत्रमुग्ध केले.तीनतालात त्यांनी वेगवेगळ्या घराण्याचे कायदे,रेले,पलटे, पेशकार,लग्या, तुकडे , पढंत, नजाकतीने पेश केले.श्रोत्यांच्या आग्रहावरून त्यांनी जेव्हा केवळ विविध लग्या सादर केल्या तेव्हा यश खडके या लहेराची साथ हार्मोनियमवर देणाऱ्या यश खडके यांनी वाजवलेली ‘ याद पिया की आये’ ची धून श्रोत्यांची मोठी दाद मिळवून गेले.वादनातील सहजतेने उपस्थित प्रत्येक श्रोता तल्लीन झाला होता.याच कार्यक्रमाने पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सांगता झाली तेव्हा गायनाचार्य गोविंदराव जळगांवकर नाट्यगृह श्रोत्यांच्या मोठ्या उपस्थितीने तुडुंब भरलेले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत उमरीकर आणि दीपाली कुलकर्णी यांनी केले.
