भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश विश्वविजेता ठरला आहे. दोम्माराजू गुकेश ने १८व्या वर्षी विश्वविजेता होण्याचा बहुमान पटकावला. १८वर्षीय गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता डिंग लिरेनचं आव्हान मोडून काढत इतिहास घडवला.या ऐतिहासिक विजयानंतर गुकेश काही काळ पटावर डोकं ठेवून अश्रू आवताना दिसला, लहानवयात जगातिल युवा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला होता आणि आज त्याने स्वप्न सत्यात उतरवले. त्यामुळे या विजयाचा आनंद आणि महत्त्व हे त्याच्यापेक्षा दुसरं कुणीच सांगू शकत नाही.
सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन्स
डी गुकेश (२०२४)- १८ वर्ष, ८ महिने, १४ दिवस
गॅरी कास्परोव्ह ( १९८५ ) – २२ वर्ष, ६ महिने, २७ दिवस
मॅग्नस कार्लसन ( २०१३) – २२ वर्ष, ११ महिने, २४ दिवस
मिखाईल ताल ( १९६० )- २३ वर्ष, ५ महिने, २८ दिवस
अनाटोली कार्पोव्ह ( १९७५) – २३ वर्ष,१० महिने, ११ दिवस
१३व्या डावापर्यंत दोन्ही खेळाडूंनी ६.५ असे समसमान गुण कमावले होते आणि त्यामुळे १४व्या आणि शेवटच्या डावाकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. डिंग लिरेनने उशिरा केलेल्या चुकीने गुकेशला विजय मिळवून दिला. २०१२ मध्ये विश्वनाथन आनंद याच्यानंतर वर्ल्ड चॅम्पियन बनणारा गुकेश हा पहिला भारतीय ठरला. गुकेशसाठी हे स्वप्नवत वर्ष आहे, कारण त्याने २०२४ मध्ये बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. चार तासांत ५८ चालीनंतर लिरेनविरुद्ध १४वा गेम गुकेशने जिंकला.
गुकेशने गुरुवारच्या निर्णायक डावापूर्वी तिसरा आणि ११ वी फेरी जिंकली होती, तर ३२ वर्षीय लिरेनने सुरुवातीच्या आणि १२व्या गेममध्ये विजय मिळवला होता. डोम्माराजू गुकेशचा जन्म २९ मे २००६ मध्ये चेन्नईत झाला. गुकेश हा इतिहासातील तिसरा सर्वात लहान ग्रँडमास्टर आहे. ज्याला FIDE ने मार्च २०१९ मध्ये ग्रँडमास्टर पद दिले होते. बुद्धीबळात २७०० गुणांचे रेटिंग पूर्ण करणारा तो इतिहासातील तिसरा सर्वात लहान खेळाडू आहे,तर २७५० गुणांचे रेटिंग पूर्ण करणारा सर्वात लहान खेळाडू आहे. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी, वयाच्या सोळाव्या वर्षी, त्याने तत्कालीन जगज्जेता मॅग्नस कार्लसनला पराभूत केले होते आणि असा पराक्रम करणारा सर्वात लहान होता.