मुंबई(प्रतिनिधी) विधासनभा अध्यक्षपदी राहूल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होणार आहे. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर आता उद्या त्यांच्या बिनविरोध निवड होणार आहे.राज्याच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला काल 7 डिसेंबरला सुरूवात झाली. नुकतंच राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असून, 5 डिसेंबरला या सरकारचा शपथविधी पार पडला. सत्तास्थापनेनंतर लगेचच 7 ते 9 डिसेंबरला राज्यात विशेष अधिवेशनाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर हंगामी अध्यक्ष म्हणून कालीदास कोळंबर यांची निवड करण्यात आली होती.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात उद्या 9 डिसेंबरला राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात येईल. भाजप आणि महायुतीला राज्यात मिळालं असून, फक्त भाजप पक्षाकडूनच विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता, त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष होण्याचा राहुल नार्वेकर यांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विधानसभा उपाध्यक्षपद महाविकास आघाडीला द्यावं अशी मागणी केली आहे.
राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर 2022 ला महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी 6 जुलै 2022 ला राहुल नार्वेकर यांनी पहिल्यांदा विधासनभा अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. शिवसेना पक्ष फूट, राष्ट्रवादी पक्ष फूट अशा महत्वाच्या प्रकरणांमध्ये राहुल नार्वेकर यांनी सुनावणी केल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष होते. त्यामुळे आता या पदासाठी कुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.