
तीर्थपुरी (दिनांक 5 डिसेंबर): येथील पशुपतिनाथ मंदिर देवस्थान आयोजित ह भ प प्रतीक्षा महाराज कर्डूळे यांच्या संगीतमय श्री शिवमहापुराण कथेचे सातवे पुष्प गुंफताना कथा ठिकाणी तीर्थपुरीकरांचा जनसागर उसळला. भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत कथेचा आनंद घेतला. कथेची सुरुवात सामूहिक आरतीने व श्री शिवाय नमस्तुभ्यम या जपाने झाली.
सातव्या दिवशीच्या आपल्या निरुपणामध्ये हभप कु. प्रतीक्षा महाराज यांनी सांगितले,” ही कथा आपणास सहज प्राप्त झाली आहे. एखादी गोष्ट सहज भेटल्यास तिचा उपयोग करून घेता आला पाहिजे, ते जमले पाहिजे . हे शिवकथेचे कथाअमृत आपण कथेतील काही गोष्टी, श्लोक ,नावे लवकर आपल्या लक्षात जरी राहिली नाहीत, तरी लक्ष देऊन कथा ऐकल्यास फायदाच होईल. कथेमुळे योग्य आचरण व्हावे, कथेमुळे मनातील भेद नष्ट होणे महत्त्वाचे आहे .आपले आचरण मंगल करायचे असेल तर कथा लक्ष देऊन ऐकली पाहिजे. श्लोक लक्ष देऊन ऐकल्यास
चित्त स्थिर राहील . चांगले विचार संताकडून व कथेमधून मिळतात . खळांना मिटवण्यापेक्षा त्यांची खळवृत्ती नष्ट होणे गरजेचे आहे . जिथे जी वस्तू मिळते तिथेच ती मागावी, भलतीकडे मागू नये. योग्य ठिकाणी योग्य कृती करावी” .
अशा पद्धतीने विचार अमृत मांडताना प्रतीक्षा महाराजांनी नंदीची व मार्कंडेय ऋषीची कथा सांगितली . एकदा वाहिलेले बेलपत्र धूऊन परत अर्पण केल्यास चालते, ही नंदी महाराजांचीच कृपा आहे. एक लोटा जल नियमित किंवा सोमवारी वाहिल्यास पुण्य मिळते . बेल पत्र, शमीचे पान, रुटीचे फुल इत्यादीचे महत्त्वही त्यांनी सांगितले .
कब से खडा है झोली पसार ,
क्यू ना सूने तू मेरी पुकार.
मुझे तेरा ही सहारा है
हे मेरे भोले बाबा . या महाराजांनी गायलेल्या सुमधुर शिवभजनास श्रोत्यांनी तल्लीन होत नृत्य करत साथ दिली .
प्रदोष कथा महत्व विशद करताना ‘भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चंद्र दर्शन करू नये’ असे गणपती व चंद्र या कथेनुसार सांगितले . गणपतीचा जन्म कथा सांगत असताना ‘गणपती – शंकर’ युद्ध झाकीच्या माध्यमातून सांगितले . मंदिरामध्ये चौकटीला गणपतीची मूर्ती असते. त्याप्रमाणे काही लोक आपल्या घराच्या चौकटीलाही गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावतात, हे योग्य नाही. यावेळी त्यांनी धर्म, अर्थ ,काम, मोक्ष या ४ पुरुषार्थाची माहिती सांगितली. याप्रसंगी नाट्यरूपात “पार्वतीच्या बाळा- तुझ्या पायात वाळा, गणपती माझा नाचत आला” हे भक्ती गीत उपस्थित श्रोत्यांच्या उत्स्फूर्त गोलाकार रंगनृत्य पावली व फुगडीच्या सहभागासह गायीले गेले .
आपल्या समारोपाच्या विवेचनामध्ये उद्याच्या कथेमध्ये रिद्धी- सिद्धी विवाह, बारा ज्योतिर्लिंग कथा सांगितली जाईल .तसेच मागील वर्षभरामध्ये संपूर्ण देशात गाजत असलेले “राम आयेंगे ,मेरी झोपडी के भाग आज खुल जायेंगे” हे भजन देखील उद्या होणार आहे . असे प्रतीक्षा महाराजांनी सांगितले .
आता कथेचे दोनच दिवस शिल्लक आहेत .त्यामुळे तीर्थपुरी व परिसरातील नागरिकांनी या संगीतमय श्री शिवमहापुराण कथेचा लाभ व आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक श्री पशुपतिनाथ मंदिर संस्थान तीर्थपुरी तर्फे करण्यात आले आहे .