
पुणे (प्रतिनिधी)
पुण्यातून धक्कादायक घटना समोर आलीय. येथे एका तरुणानं त्याच्या ‘लिव्ह इन पार्टनर’ची हत्या करून तिचा मृतदेह खंबाटकी घाटात फेकला. ही घटना 24 नोव्हेंबर 2024 ला घडली. या घटनेतील आरोपी हा एका चुकीमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला.त्याला पोलिसांनी अटक केली असून, त्याने या घटनेबाबत अनेक धक्कादायक खुलासे केलेत.
पुण्यातील वाकड येथील एसी मेंटेनन्स फर्ममध्ये आरोपी (वय 32) सुपरवायझर म्हणून काम करतो. या तरुणानं त्याच्या 27 वर्षीय ‘लिव्ह इन पार्टनर’ची हातोड्यानं मारून हत्या केली. त्यानंतर तरुणीचा मृतदेह वाकडपासून 130 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खंबाटकी घाटात फेकून दिला. त्यानंतर त्याने मृत तरुणीच्या तीन वर्षांच्या मुलाला आळंदीत सोडून दिले आणि मुलगा हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली.
मृत तरुणी ही मूळची बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी असून, लग्नाच्या सहा महिन्यांनंतरच ती पतीपासून विभक्त झाली होती. नंतर ती पुण्याला आली होती. येथे तिचं आरोपीशी रिलेशनशिप सुरू झालं. ती त्याच्यासह मारुंजी येथे फ्लॅटमध्ये राहत होती.
संशयावरून हत्या…
आरोपीला त्याच्या पीडितेचे कोणाशीतरी अफेअर सुरू आहे, असा संशय आला होता. यावरून वाकड सर्व्हिस रोडवर दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. या वादातूनच आरोपीने तरुणीवर हल्ला करून तिचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणीचा मृतदेह खंबाटकी घाटात फेकून दिला. त्यानंतर आरोपी त्याच्या फ्लॅटवर परतला. तेथून पीडितेच्या मुलाला घेऊन 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या आळंदी येथे सोडले. 25 नोव्हेंबर 2024 ला आरोपीनं हिंजवडी पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुलाचा शोध सुरू केला असता तो आळंदी पोलिसांना सापडल्याचं समजलं. पण आरोपीनं त्याची ‘लिव्ह इन पार्टनर’ हरवल्याची तक्रार नोंदवली नसल्यानं पोलिसांना त्याच्यावर संशय आला.
खुनाचा उलगडा असा झाला..
पोलिसांनी आरोपीला 26 नोव्हेंबर 2024 ला ‘लिव्ह इन पार्टनर’ हरवल्याची तक्रार दाखल करण्यास सांगितलं. त्यानुसार तरुणानं वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पण त्याच दिवशी खंबाटकी घाटाजवळील झुडपात एका ट्रकचालकानं महिलेचा मृतदेह पाहिला आणि सातार्यातील खंडाळा पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. सदर महिलेचा मृतदेह हा आरोपीच्या ‘लिव्ह इन पार्टनर’चा असल्याचं समोर आलं. त्यावर पोलिसांनी आरोपीचे फोन रेकॉर्ड तपासले असता त्याचा फोन 24 ते 26 नोव्हेंबर 2024 दरम्यान बंद असल्याचं आढळून आलं. अखेर पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.