
ईव्हीएम विरोधात बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाचा आज तिसरा दिवस होता, उद्धव ठाकरेंच्या शब्दाला मान देत त्यांनी उपोषण सोडले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी उपोषणाला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यांची भेट घेतली.तर त्याआधी अजितदादा पवार यांनी बाबांच्या समोरच ईव्हीएम हॅक होत नसल्याचे स्वतःचे अनुभवसिद्ध मत सांगितले.
यावेळी उद्धव ठाकरे ते म्हणाले की, आता सत्यमेव जयते एेवजी सत्तामेव जयते सुरु आहे. राक्षसी बहुमत मिळालेले असतानाही लोक राजभवनावर जाण्याएेवजी शेतात पूजा अर्चा करायला का जात आहेत असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला. दरम्यान बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरेंच्या हट्टाला मान देत पाणी घेऊन उपोषण सोडले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ही आम्ही ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेबाबत आंदोलन करणार आहोत. ही फक्त सुरुवात आहे. या ठिणगीचा वणवा होईल, इथे जिंकलेले हारल्यासारखे येत आहेत आणि हारलेले जिंकल्यासारखे येत आहेत असाही टोला त्यांनी अजित पवारांचे नाव न घेता लगावला. ठाकरे पुढे म्हणाले की, मी दिलेले मत कुठे जाते हे जाणून घेण्याचा अधिकारच काढून घेतला आहे. त्यामुळे सगळ्या चिट्ठ्या मोजल्या गेल्या पाहिजेत
उद्धव ठाकरेंनी बाबा आढाव यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, ते म्हणाले की, तुम्ही आत्मक्लेश करुन घेऊ नका, आपण एक आहोत हे दिसलं पाहिजे. महाराष्ट्र लेचापेचा नाही, महाष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी पुढे येईल असा मला विश्वास आहे. आम्ही रस्त्यावर उतरुन बाबा तुमचे आंदोलन पुढे नेऊ असंही ठाकरे म्हणाले.
बाबा आढाव म्हणाले की उद्धव ठाकरेंचे आजोबा महात्मा फुले यांच्याशी विचारांशी जोडले गेले आहेत. उद्धव ठाकरे फुले वाड्यात आलेत. आम्ही सत्यमेव जयतेसाठी आंदोलन करत आहोत. आता सत्तेचा धुमाकूळ सुरु आहे. मुंबई कोणाची आहेत हे आम्ही आज नाही तर आधीपासूनच बोलत आहोत. लाडक्या बहिणीला दिले पण तुम्ही 66 वर्षांच्या महिलेला काय दिले. या निवडणुकीत परकीय सत्तेचा आणि परकीय पैशाचा वापर झाला, विधानसभा निवडणुकीत कोणता चमत्कार झाला, सरकारी तिजोरीतून पैशाचे वाटप झाले. निवडणुकीत बटेंगे तो कटेंग हा अजब मुद्दा होता. शेतक-यांची फसवणूक सुरु आहे.
एकच पक्ष आणि एकच नेता याचा विरोध व्हायला हवा असेही बाबा आढाव यांनी सांगितले मजुरांना पेन्शन द्या ही माझी वर्षानुवर्षाची मागणी आहे. तुम्ही सरकार विरोधात काही बोलले तर राजद्रोह होतो असा हल्लाबोलही त्यांनी सत्ताधा-यांवर केला.