
पुणे-
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात यंदाच्या वर्षी आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांची घोषणा मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

यंदा महोत्सवाचे ७० वे वर्ष असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे बुधवार दि. १८ डिसेंबर ते रविवार दि. २२ डिसेंबर, २०२४ दरम्यान महोत्सव संपन्न होणार आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेवेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद संगोराम, विश्वस्त शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, आनंद भाटे, डॉ प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे हे देखील उपस्थित होते.

यावर्षीच्या महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना श्रीनिवास जोशी म्हणाले, “माझे वडील भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी आपले गुरु सवाई गंधर्व यांच्या नावाने सुरु केलेल्या या महोत्सवात आजवर अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे.

रसिक, जाणकार श्रोत्यांनी देखील महोत्सवावर अपार प्रेम केले. यंदा ७० व्या वर्षात महोत्सव पदार्पण करीत असताना नवोदित तरीही आश्वासक, दमदार कलाकारांना ‘सवाई’ सारखे व्यासपीठ मिळावे, या हेतूने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिग्गज कलाकारांसोबत नव्या दमाच्या कलाकारांचे सादरीकरण महोत्सवात होणार आहे.