मुंबईत- राज्यात कुणाची सत्ता येणार, हे पुढील काही तासांत समजेल. पण त्याआधीच मुख्यमंत्री कोण, यावरून महायुतीसह महाविकास आघाडीतही दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. सट्टा बाजारातही निवडणुकीच्या निकालाबाबत अंदाज वर्तवले जात असून आतापर्यंतचा कल महायुतीच्या बाजूने आहे.
महायुतीमध्ये प्रामुख्याने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तीन प्रमुख दावेदार आहे. त्यांच्या पक्षातील नेते याबबात दावे करत आहेत. तर महाविकास आघाडीतील नेत्यांमध्येही यावरून जुगलबंदी सुरू आहे. सट्टा बाजारात मात्र एका नावाची सर्वाधिक चलती आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस.
मुंबई आणि राजस्थानातील फलोदी सट्टा बाजाराने राज्यात महायुतीचीच पुन्हा सत्ता येईल असा अंदाज वर्तवला आहे. तर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत फडणवीस हे सर्वात पुढे असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार महायुतीत भाजपला 90 ते 95 जागा मिळू शकतात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 35 ते 40 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 ते 15 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
फलोदी सट्टा बाजारानेही फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये आघाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. फडणवीसांवरह सर्वाधिक बोली लागत असल्याचे समजते. या बाजाराच्या अंदाजानुसार महायुतीला 144 ते 152 जागा मिळू शकतात. तर भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज आहे.
मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीकडे कल दिसून आला आहे. बहुतेक पोलमध्ये महायुतीला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, लोकसभा आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत वर्तवण्यात आलेल्या याच एक्झिट पोल आणि सट्टा बाजाराचे अंदाज सपशेल चुकले होते. त्यामुळे महाराष्ट्रातही हे अंदाज चुकणार की त्याप्रमाणे निकाल लागणार हे पुढील काही तासांत स्पष्ट होईल.