पर्थ- बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी कसोटी पदार्पण करणाऱ्या नितीश रेड्डी आणि ऋषभ पंत यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला टिकाव धरता आला नाही.तर कर्णधार जसप्रीत बुमराहच्या अचूक आणि जलदगती गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाची अवस्था देखील 7 बाद 67 अशी झाली असून ते अजून 83 धावांनी पिछाडीवर आहेत.
अशाप्रकारे पर्थमध्ये पहिल्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाने चहापानाच्या ब्रेकपर्यंत भारताला पहिल्या डावात अवघ्या 150 धावांत गुंडाळले. भारतीय संघाला 50 षटकेही खेळता आली नाहीत. उसळत्या हिरव्यागार खेळपट्टीवर कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंत (78 चेंडूत 37 धावा) आणि रेड्डी यांनी सातव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे टीम इंडियाला 150 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात यशस्वी गोलंदाज जोश हेझलवूड होता ज्याने 4 भारतीय फलंदाजांना बाद केले. तर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
भारताच्या 150 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवातही अत्यंत खराब झाली. पहिला कसोटी सामना खेळणारा नॅथन मॅकस्विनी तिसऱ्याच षटकात बुमराहचा बळी ठरला. नंतर बुमराहने 7 व्या षटकात बुमराहने अप्रतिम गोलंदाजी करत चौथ्या चेंडूवर उस्मान ख्वाजाला आपला पहिला बळी बनवला. राऊंड द विकेटवरून गोलंदाजी करताना, बुमराहने ऑफ स्टंपच्या ओळीत चांगला लांबीचा चेंडू टाकला, जो पडल्यानंतर कोनात येण्याऐवजी बाहेर आला. हा चेंडू उस्मान ख्वाजाला समजू शकला नाही आणि चेंडू बॅटच्या बाहेरील काठाला किस करत दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कोहलीच्या हातात गेला.
ख्वाजाच्या विकेटच्या धक्क्यातून ऑस्ट्रेलियन संघ अजून सावरला नव्हता, तेव्हा बुमराहने त्याच्या पहिल्याच चेंडूवर नवीन फलंदाज म्हणून क्रीझवर आलेल्या अनुभवी स्टीव्ह स्मिथला बाद करून खळबळ उडवून दिली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज गोल्डन डकवर आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.याबरोबर जसप्रीत बुमराहने नवा विक्रम रचला. जसप्रीत बुमराह हा जगातील फक्त दुसरा गोलंदाज ठरला आहे ज्याने स्टीव्ह स्मिथला कसोटीत गोल्डन डकवर बाद करण्याचा महान पराक्रम केला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या नावावर ही कामगिरी नोंदवली गेली होती. स्टेनने 2014 मध्ये ही मोठी कामगिरी केली होती. आता स्टेनच्या या खास क्लबमध्ये बुमराहच्या नावाचाही समावेश झाला आहे.