गेवराई दि.१९ (प्रतिनिधी)
तालुक्याच्या विकासात सर्वाधिक योगदान असणारे माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांचे धाकले चिरंजीव विजयसिंह पंडित सध्या निवडणूक रिंगणात आहेत, गेल्यावेळी थोडीशी चूक झाली आणि विजयसिंहचा निसटता पराभव झाला, आता मात्र तालुक्यातील जुने जाणते लोक एकत्रित आले असून यावेळी दादांचा वारसा पुढे नेण्यासाठी विजयराजे यांना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे,आज तालुक्यातून विजयसिंह पंडितांसाठी चांगले वातावरण निर्माण झाले असून एका तरुण नेतृत्वाला आमदार करण्यासाठी गावागावातून जुनीजाणती मंडळी एकवटली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेवराई तालुक्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक वेळी बदलते चित्र निर्माण झालेले आहे या तालुक्यांमध्ये ,माजी मंत्री. शिवाजीराव पंडित यांना मानणारा मोठा वर्ग सुरुवातीपासूनच आहे त्यांच्या राजकारणापासूनच तालुक्याच्या विकासाला गती मिळाली. अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडले गेले त्यातच दादांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या जयभवानी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली आणि शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला, एवढेच काय तर कारखान्यात शेकडो तरुणांना रोजगारही उपलब्ध झाला त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग आजही त्यांच्या सोबतीला आहे.
आज त्यांचे चिरंजीव विजयसिंह पंडित निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. गेवराई तालुक्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये जुन्या जाणत्या लोकांचे एकत्रीकरण जेव्हा होते तेव्हा तालुक्याचा निकाल हा चमत्कारिक असतो असा आजपर्यंतचा अनुभव आहे आणि असाच अनुभव उद्याच्या होणाऱ्या मतदानातून दिसणार आहे, अनेक गावचा आढावा घेतला असता जुन्या जाणत्या लोकांनी आता एकत्रित येऊन शिवाजीराव दादांचे चिरंजीव विजयसिंह पंडित यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना एक नंबरची पसंती दिली जात आहे. कुठल्याही जातीपातीचे राजकारण न करता दादांनी सर्वांना सोबत घेऊन राजकारण केले आहे, त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता एक तरुण आमदार तालुक्याला मिळावा अशीच भावना जुन्या जाणत्या लोकांनी व्यक्त केली आहे उद्या होणाऱ्या मतदानातून विजयराजे पंडित यांना भरपूर मताने विजयी करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ईतिहास घडवा-भाऊसाहेब नाटकर
तालुक्यातील आजी माजी आमदार यांनी सत्ता उपभोगली त्यांची केंद्रात आणि राज्यात सत्ता होती. त्याचा वापर त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी कमी आणि स्वतःच्या व परिवाराच्या भल्यासाठीच केला. तालुक्यातील दलित – मुस्लिम – मराठा बांधवांच्या समाजासाठी काय विकास कामे केली ते जाहीरपणे त्यांनी सांगावीत. अशी खरमरीत टीका करुन, नव्या उमेदीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना विक्रमी मताधिक्य देऊन ईतिहास घडवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी केले.
भाऊसाहेब नाटकर म्हणाले की, गेवराई तालुक्यातील आजी-माजी आमदारांनी गेली पंचवीस वर्ष संपूर्ण सत्ता उपभोगली मात्र विकास तालुक्याचा केला नाही. जनकल्याणासाठी सत्तेचा वापर करावा लागतो याचा विसर त्यांना सोईस्करपणे पडला होता. जनकल्याण तर सोडाच स्मशानभूमीचा देखील विकास केला नाही, उलट ती घशात घातली. त्यांनी पंचवीस वर्षात काय केले आणि कुठे विकासाच्या वाती उजळविल्या ते जग जाहीर करावे. मतदार बांधवांनी विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नये असे आवाहन करून महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या घड्याळ या चिन्हासमोरचे बटन दाबून त्यांना विधानसभेत पाठविण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत बाजार समितीचे सभापती मुजिब पठाण, उपसभापती विकास सानप, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जयदीप औटी यांच्यासह मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.