
उमापूरच्या जाहिरसभेत विजयावर शिक्कामोर्तब
गेवराई दि.१८(प्रतिनिधी)
लोकसभेला झाले ते चुकीचे झाले. आम्ही कधी जातीपातीचे राजकारण केलेले नाही. जातीपातीच्या राजकारणामुळे येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य बरबाद होणार आहे. लोकसभेचा पराभव लक्षात ठेवून मतदान केले, तर आपले मत विभाजन होऊन याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. महाविकास आघाडीचा फायदा म्हणजे धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे, अमरसिंह पंडित या सर्वांचेच नुकसानच आहे तेव्हा जातीपातीचा आणि किंतू परंतु चा विचार न करता महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन ना. धनंजय मुंडे यांनी केले. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ आयोजित उमापूर येथील सभेमध्ये बोलत होते.

यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आखाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सुरेश हात्ते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मूजीब पठाण, आरपीआय कवाडे गटाचे अनिल तुरूकमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गेवराई तालुका अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश सुरवसे, अशोक हिंगे, जेष्ठ नेते आप्पासाहेब औटी, महेश रावडे, श्रीकांत सानप, उद्धव खाडे, जालिंदर पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मी मुंडेची अवलाद आहे. मुंडेंची अवलाद अंधारामध्ये काही निर्णय घेत नाही. आम्ही जो निर्णय घेतो तो स्पष्ट असतो आणि आमचा निर्णय म्हणजे विजयराजे पंडित यांना आमदार करण्याचा आहे. यासाठी पंकजाताई मुंडे, मी व भैय्यासाहेब मिळून विजयराजे यांना आमदार करू. २००२ ला मी व भैय्यासाहेब जिल्हा परिषद सदस्य असताना असलेली मैत्री कायम आहे. मी त्यांना तेंव्हापासून ओळखतो. तालुक्याच्या विकासाचे स्वप्न ऊराशी बाळगुन हा माणूस अविरत कार्यरत आहे. आपल्या छोट्या भावाला आमदार करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करतोय. असे बंधुप्रेम विरळच असते. भैयासाहेब मी तुम्हाला शब्द देतो विजय राजे उद्याच्या 23 तारखेला आमदार असतील आणि गुलाल आपलाच असेल, उपस्थितांचे चेहरे पाहता विजयसिंह पंडित यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, गेवराई विधानसभा मतदारसंघ पाणीदार करणे हे आमचे ध्येय आहे, त्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत, विरोधक मात्र केलेल्या कामावर न बोलता माझ्यावर व माझ्या परिवारावर टिका करत आहेत, आम्ही त्याला भिक घालत नाही. आम्हाला लोकांची साथ आहे. विजयसिंह पंडित यांना विजयी करून राज्याच्या सर्वोच्च पंचायतीमध्ये पाठवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आखाडे,सभापती मुजीब पठाण अशोक हिंगे, आप्पासाहेब औटी यांनी मनोगत व्यक्त केले.
माजी.आ.विलासराव खरात यांचा गोदाकाठच्या गावात प्रचार
महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ माजी आमदार विलास बापू खरात यांनी मतदारसंघाच्या गोदाकाठावर झंजावती दौरा करून गेवराई तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना विजयी करण्याच आवाहन केले. माजी आमदार विलासराव खरात यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघातील रामपुरी, तलवाडा, मनुबाई जवळा आदी गावासह वाडी, वस्ती, तांड्यावर जाऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांनी गेवराई तालुक्याला विकासाच्या वाटेवर आणले, पण गेल्या काही वर्षांमध्ये मतदार संघाच्या विकासाचा अनुशेष शिल्लक राहिलेला आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली विजयसिंह पंडित यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरघोस निधी या तालुक्याला उपलब्ध करून दिला. यापुढील काळामध्ये मतदारसंघातील स सिंदफणा नदीवर बॅरेजची उभारणी करण्यासाठी विजयसिंह पंडित यांना विजयी करून विधानसभेत पाठविणे गरजेचे आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळू शकते. यावेळी त्यांच्यासमवेत भारतराव पंडित, दत्तात्रय मस्के, सुभाष पवार ,किसनराव पवार यांच्यासह परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विलासराव खरात यांच्या दौऱ्याला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा महासंघाचे अध्यक्ष राजेश गवळी, सचिव रंगनाथ मोकाशी यांनी केली.राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय महासंघाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. याप्रसंगी प्रदीप गवळी, अमोल दायमा, राजेंद्र माने,
वैभव चिंचोलकर, राजू गावडे यांच्यासह राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते