गेवराई, दि.२५ (प्रतिनिधी) ः- माझा लढा सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी आणि जन कल्याणासाठी आहे, गेवराई विधानसभा मतदार संघाचा सर्वांगिन विकास हाच आमचा एकमेव ध्यास आहे. जनसेवेचा वसा आणि वारसा अविरत पुढे सुरु ठेवण्यासाठी मला एकवेळ संधी द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांनी मतदारांच्या गाठीभेटी आणि संवाद दौऱ्यात केले. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जोरदार आघाडी घेतली असून गेवराई शहरासह ग्रामीण भागात आणि संपुर्ण मतदार संघात त्यांना पहिली पसंती मिळत आहे.
गेवराई विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतदार संघातील विविध गावांना भेटी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांनी सर्वसामान्यांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी सुसंवाद साधला. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, आदरणीय शिवाजीराव (दादा) पंडित आणि अमरसिंह पंडित यांनी मतदार संघाच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेले आहेत. मिळालेल्या सत्तेचा वापर जनसामान्यांसाठी केला, निराधारांना आधार देण्याचे काम आणि आडलेल्या लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे केलेले आहे. कशाचीही अपेक्षा न ठेवता मतदारांची सेवा करण्याचे काम आम्ही केलेले असून आमचा हा लढा सत्तेसाठी कधीच असणार नाही तर जनसेवेसाठी असणार आहे. जनसामान्यांचा आवाज सभागृहात उठविण्यासाठी मला एकवेळ विधानसभेत जाण्याची संधी द्यावी, मिळालेल्या संधीचे सोने केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे अभिवचन त्यांनी मतदारांना दिले. शिवछत्र परिवाराने कधीही स्वार्थ पाहिलेला नाही, आपल्या मतदार संघाचा विकास व्हावा याकरीता आदरणीय दादांनी आपल्याला मिळालेल्या संधीचा त्याग करून तत्कालीन परिस्थितीत सुंदरराव सोळुंके यांना बिनविरोध निवडून आणले होते, हे गेवराईची जनता कधीही विसरलेली नाही. गेवराई तालुका पाणीदार व्हावा, कष्टकरी व कामगारांच्या हातातील कोयता गळून पडावा याकरीता आपली प्रांजळ तळमळ आहे. आपण मला काम करण्याची संधी द्यावी मी तुमच्या कायम ऋणात राहील असेही विजयसिंह पंडित बोलताना म्हणाले.
विजयसिंह पंडित यांच्या संवाद दौऱ्याला ग्रामस्थ व मतदारांनी उत्स्फुर्त पाठिंबा दर्शवित त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी विजयसिंह पंडित यांचे जोरदार स्वागत केले. दरम्यान गेवराई विधानसभा मतदार संघात विजयसिंह पंडित यांनी रोखू शकणार नाही अशा प्रतिक्रिया मतदार संघातून व्यक्त होत आहेत.
तालखेड सर्कलचा विकासाचा अनुशेष भरुन काढणार..
माजलगाव तालुक्यातील तालखेड सर्कल गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये आले तेव्हापासून या सर्कलने शिवछत्र परिवारावर कायम प्रेम केले. या भागातील नागरिकांच्या आम्ही कायम संपर्कात आहोत. येणाऱ्या काळात सुद्धा या भागातील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी मला आशीर्वाद द्या. एक वेळ संधी द्या, मिळालेल्या संधीचे सोने केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असे प्रतिपादन विजयसिंह पंडित यांनी केले. तालखेड सर्कल मध्ये विविध गावातील मतदारांची संपर्क संवाद साधताना ते बोलत होते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुती अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांनी तालखेड सर्कलमधील बाराभाई तांडा, राजेगाव, तेलगाव, शृंगारवाडी, सावरगाव आदी गावांमध्ये कॉर्नर बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, हा भाग गेवराई व माजलगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून भौगोलिक दृष्ट्या जास्त अंतर असल्याने विरोधी उमेदवार इकडे फिरकतही नाहीत, परंतु मी व भैय्यासाहेब सतत आपल्या संपर्कामध्ये असतो. या भागातील ऊस गाळपाचा प्रश्न सोडवण्यासाठी जय भवानी सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर या भागातील नागरिकांच्या अडीअडचणी आणि वैयक्तिक कामे मार्गी लावण्यासाठी आपण माजलगाव येथे लवकरच संपर्क कार्यालय सुरू करणार आहोत. आपण कसलाही किंतु परंतु मनात न ठेवता येणाऱ्या २० तारखेला घड्याळ यख चिन्हा समोरील बटन दाबून मला आशीर्वाद द्या मी तुमच्या काय ऋणात राहील असेही ते या वेळी बोलताना म्हणाले.
यावेळी ॲड शरद चव्हाण, राजेगावचे सरपंच शरद कचरे, कांबी मांजराचे सरपंच शाम मुळे, तेलगाव खुर्द चे सरपंच गोरख तांदळे, माजी सरपंच अनिरुद्ध तौर, सुभाष मस्के, तालखेडचे सरपंच गुलाब मोरे, एकदऱ्याचे सरपंच प्रताप पाटील, जजीद जवळाचे सरपंच बळीराम यादव, सरपंच संतोष जाधव, संचालक बाबासाहेब परतुरकर, अशोक शेळके अंगद कचरे, संभाजी कचरे, अमर साळवे, विजय तांदळे, विश्वंभर बोरवडे, महादेव सचगणे, पांडुरंग तांदळे, राम रोडगे, नंदकिशोर सजगणे, वशिष्ठ येवले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा युवामोर्चाचा शुभम महात्मे पाठिंबा
भाजपा पदवीधर प्रकोष्टचे मराठवाडा संयोजक व भाजपा युवा मोर्चाचे माजलगाव तालुका उपाध्यक्ष शुभम महात्मे यांनी भारतीय जनता पार्टी च्या वतीने आज महायुतीचे हात बळकट करण्यासाठी पाठींबा देऊन मौजे सावरगाव येथील व तालखेड जि. प. सर्कल मधुन भाजपा राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडीत यांना जास्तीत जास्त मतांची आघाडी देण्याचा विश्वास दिला
या वेळी शुभम महात्मे पाटील यांचे सहकारी अंगद नाईकनवरे, किरण नाईकनवरे, प्रविन खराडे, विलास नाईकनवरे, रोहीदास महात्मे पाटील, मनोज जाधव, अजय जाधव, सौरभ जाधव, संजय क्षीरसागर, प्रतीक प्रधान, बालमा शिंदे, तुषार क्षीरसागर यांच्यासह बाजार समितीचे संचालक परमेश्वर नाईकनवरे, बाळासाहेब नाईकनवरे, नितीन जगताप व दत्ताभाऊ नाईकनवरे उपस्थित होते.