भारतीय संघाने पुन्हा एकदा टी-२० क्रिकेटमध्ये बेधडक फलंदाजी करत टी-२० क्रिकेटमधील दुसरी सर्वाेच्च धावसंख्या उभारली आहे. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या शतकांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध फक्त १ विकेट गमावत २८३ धावांचा पर्वत उभारला. हा सामना भारताने १३५ धावांनी जिंकत मालिका ३-१ ने जिंकली.
संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी वादळी फलंदाजीच्या जोरावर सामन्यात विश्वविक्रम केले आहेत.
संजू सॅमसनने दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा शतक झळकावलं आहे. तर तिलक वर्माने लागोपाठ दुसरं शतक झळकावलं आहे. संजू-तिलकने २१० धावांची विक्रमी भागीदारी रचली. तर अनेक विविध विक्रम टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या आपल्या नावे केले आहेत.
संजू-तिलकचे विक्रमच विक्रम
संजू सॅमसनने आपल्या टी-२० कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले आणि त्याने ही ३ शतकं २०२४ मध्ये केली आहेत. अशाप्रकारे, एकाच वर्षात आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ३ शतकं करणारा तो पहिला फलंदाज ठरला.
संजू सॅमसन एकाच मालिकेत दोन शतकं करणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला, तर काही वेळातच तिलक वर्मानेही त्याच्या विक्रमाची पुनरावृत्ती केली आणि असे करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला. या दोघांपूर्वी संपूर्ण जगात केवळ इंग्लंडचा फिल सॉल्ट असा पराक्रम करू शकला आहे.
तिलक वर्माने आपल्या टी-२० कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले आणि लागोपाठ त्याचे दुसरे शतक आहे. सेंच्युरियनमध्येही त्याने शतक झळकावले. अशाप्रकारे, संजू नंतर, सलग दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकं करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला.
तिलकने अवघ्या ४१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे, जे रोहित शर्मा (३५) आणि संजू सॅमसन (४०) नंतर भारतासाठी या फॉरमॅटमधील तिसरे जलद शतक आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत संजू सॅमसन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे कर्णधार सूर्यकुमार यादव (४) आणि माजी कर्णधार रोहित शर्मा (५) आहेत.
संजू आणि तिलक यांनी एकाच सामन्यात शतकं झळकावली आणि अशा प्रकारे, पूर्ण सदस्य देशांमध्ये (म्हणजेच कसोटी क्रिकेट खेळणारे देश) टी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच एका संघातील दोन खेळाडूंनी शतकं केली आहेत.
संजू आणि तिलकने दुसऱ्या विकेटसाठी २१० धावांची (नाबाद) भागीदारी केली, जी आंतरराष्ट्रीय टी-२० इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी आहे. खरं तर, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात २००हून अधिक धावांची भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
टीम इंडियाने आपल्या डावामध्ये एकूण २३ षटकार ठोकले आहेत, जो टी-२० मध्ये एक नवा विक्रम आहे. यापूर्वी भारत, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानने प्रत्येकी २२ षटकार मारले होते.
या मालिकेत तिलक वर्मा आणि संजू यांनी मिळून एकूण ४ शतकं केली आहेत. एखाद्या संघाने मालिकेत ४ शतकं झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
टीम इंडियाची २८३ धावांची धावसंख्या दोन पूर्ण सदस्य देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यांमधली दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. सर्वोच्च धावसंख्येचा (२९७) विक्रमही भारताच्या नावावर आहे, जो गेल्या महिन्यातच बांगलादेशविरुद्ध आला होता.
सामन्यात भारताने १३५ धावांनी विजय मिळवला आणि मलिका ३-१ अशा फरकाने जिंकली.
यासह २०२४ वर्षाचा टी२० मधील शेवट गोड केला आहे. भारतासाठी टी२० क्रिकेटच्या बाबतीत २०२४ हे वर्ष खऱ्याअर्थाने ब्लॉकबस्टर ठरले. या वर्षात भारताने टी२० मध्ये इतिहास घडवला.
भारताने २०२४ वर्षात २६ टी२० सामने खेळले. यातील तब्बल २४ सामन्यात विजय मिळवले. यातील दोन विजय भारताने सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये मिळवले. विशेष म्हणजे १७ जानेवारी रोजी अफगाणिस्तान विरुद्ध बंगळुरूला झालेल्या सामन्यात बरोबरी झाल्यानंतर पहिली सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली होती.
त्यानंतर भारताने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला होता. दोन सुपर होणारा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यानंतर ३० जुलै रोजी श्रीलंकेविरुद्ध पाल्लेकेले मध्ये झालेला टी२० सामनाही भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता.
भारताने २०२४ वर्षात केवळ २ पराभव स्वीकारले आहेत. भारताने ६ जुलैला झिम्बाब्वे विरुद्ध हरारे येथे १३ धावांनी पराभव स्वीकारला. तसेच दुसरा पराभव नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या टी२० मालिकेत झाला. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ३ विकेट्सने भारताने पराभव स्वीकारला.
या संपूर्ण वर्षात भारताने एकही मालिका पराभूत झालेली नाही. भारताने या वर्षात पाच द्विपक्षीय टी२० मालिका खेळल्या. या पाचही मालिका भारताने जिंकल्या. भारताने झिम्बाब्वे दौऱ्यात ५ सामन्यांची मालिका ४-१ फरकाने जिंकली.
बांगलादेशविरुद्ध मायदेशात ३ सामन्यांची मालिका ३-० फरकाने जिंकली. अफगाणिस्तान विरुद्धची मालिकाही भारताने मायदेशात ३-० ने जिंकली. श्रीलंका दौऱ्यात भारताने ३-० फरकाने टी२० मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतानै ३-१ फरकाने विजय मिळवला.